प्रहार
– प्रकाश पोहरे
हल्ली हिंदू समाजात (Hindu Samaj) मुसलमानांविरुद्ध कधी नव्हे, एवढा विद्वेष निर्माण झाला आहे. आज ज्या लोकांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे, त्यांच्यात आज जेवढा मुस्लीमद्वेष दिसतो, तेवढा ते तरुण असताना नव्हता. मी जेव्हा माझ्या पन्नाशीच्या पुढच्या मित्रांशी बोलतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यात त्यांच्या तरुणपणी नसणारा मुस्लीमद्वेष आज मात्र प्रकर्षाने जाणवतो. हे अनुभव क्लेशकारक असून त्याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.मधल्या काळात आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारख्या हिंदुत्ववादी सांप्रदायिक शक्तींनी मुस्लिमांविरुद्ध द्वेष आणि संताप वाढवण्याचे काम सातत्याने केलेले आहे, त्याचा फायदा भाजपला मतांद्वारे झाला. मुस्लिमांविषयी द्वेष निर्माण होईल अशा किरकोळ किंवा काल्पनिक घटना ठळकपणे सांगणे; तशाच प्रकारच्या घटनांना द्वेष निर्माण होईल, अशा स्वरूपात प्रभावीपणे सादर करणे; मुस्लिमांविषयी खोट्या नाट्या गोष्टी पसरवणे; मुस्लीम अत्याचाराच्या भूतकाळातील घटनांचा पुन्हा पुन्हा उच्चार करत राहणे; असे प्रकार सर्रास केले गेलेले आहेत.
आमच्या बालपणापासूनच असे प्रयत्न होत असल्याचे दिसत होते, पण तेव्हा त्यांचे प्रमाण खूपच कमी होते, किंवा सामान्य माणसावर त्यांचा फारसा परिणाम होत नसे. पण पुढे हे प्रकार नियोजनपूर्वक आणि संघटितरित्या होत गेले. (Hindu Samaj) मालेगांवसारख्या काही ठिकाणी नियोजनपूर्वक बॉम्बस्फोट घडवून आणून त्या घटनांशी फारसा संबंध नसणाऱ्या मुसलमानांची नावे जोडणे, असे प्रकार घडलेले आहेत. समाजावर त्यांचा अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. तरुण पिढी तर समाजमाध्यमांवरच पोसलेली आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरील ज्ञानपोई त्यांना सातत्याने तथाकथित ‘ज्ञानरसा’चे अपेय पान पाजत समृद्ध (?) करण्याचे आपले कार्य अविरतपणे आणि नियोजन बद्ध रीतीने करत आहे.संघा सारख्या ज्या टोळ्या संसाधनांनी अधिक समृद्ध आहेत, त्या असे ज्ञानदान करण्यात अधिक प्रभावी ठरतात. सध्या अशा द्वेषाचे विषपान करवणाऱ्याच टोळ्या अधिक सक्षम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक विचारांच्या (?) युवकांमध्येदेखील हा मुस्लीमद्वेष प्रकर्षाने दिसून येत आहे.
याठिकाणी मी केवळ कुण्या एका धर्मियांना खुश करण्यासाठी हे लिहीत नाही. मुळातच मला वास्तव सांगायचे आहे. हा विद्वेष वाढण्याला केवळ हिंदू जातीयवादीच जबाबदार नाहीत, तर मुस्लिमांची धार्मिक कट्टरताही या स्थितीला कारणीभूत झालेली आहे.
तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. उलट मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्यात आणि त्यांची कट्टरता जोपासण्यातच आपली सत्ता आणि क्षमता वापरली. पण नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी मुस्लिमांच्या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. सच्चर आयोगाने मुस्लिमांमध्ये असलेल्या मागासलेपणाकडे पुराव्यांचा आधार देऊन आपले लक्ष वेधले होते, पण अशा अहवालांकडे लक्षच द्यायचे नाही, असे राज्यकर्त्यांनी ठरवलेले दिसते. आता हेही खरे की, मुस्लिमांमधील कट्टरतेला त्यांच्या धर्माचे स्वरूपही कारणीभूत आहे. स्वर्गप्राप्तीचे ध्येय फक्त इस्लामच्या मार्गानेच होऊ शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे इतर धर्मियांविषयी प्रेम आणि सहिष्णुतेला इस्लाम फारसा अनुकूल नाही. थोडक्यात, (Hindu Samaj) इतर धर्मांच्या सहअस्तित्वाकडे इस्लाम उदारपणे पाहू शकत नाहीत. ईश्वराप्रत पोचण्याचा प्रत्येक धर्माचा आपापला मार्ग असतो, हे तत्त्व इस्लामच्या पूर्णपणे विरोधी आहे. आमचा मार्ग इतरांच्या मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले तर एकवेळ समजून घेता येईल. पण इतरांचा मार्ग जन्नतकडे नव्हे, तर जहन्नूमकडेच जातो, असे म्हटल्याने भिन्न भिन्न समुदायात सौहार्द कसे निर्माण व्हायचे, याचा कट्टरपंथीयांनी आवर्जून विचार केला पाहिजे.
इस्लामच्या या तथाकथित सारभूत तत्त्वाच्या आधारे हिंदुत्ववादी मुस्लिमांविषयी (Hindu Samaj) हिंदू समाजात अविश्वास आणि भय निर्माण करण्यात यशस्वी होतात हे त्यांना कुणीतरी अधिकार वाणीने समजून सांगणे गरजेचे आहे.
चालू घडामोडींमध्ये या विद्वेशाचे कारण जरा वेगळे आहे. भारत आणि बांगलादेश संबंधात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील कट्टर धर्मीय नेते एकमेकांवर भाष्य करताना दिसत आहेत. बांगलादेशमध्ये (Hindu Samaj) हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे आणि निदर्शने होताहेत. उत्तर प्रदेशात तर मुसलमानांशी जो व्यवहार होताना दिसत आहे, तिथे त्यांच्या घरादारांवर जे बुलडोझर चालवण्यात येत आहेत, हिंसा करून जीव घेण्यात येत आहेत, त्याचे पडसाद आता इतरत्रही पडतांना दिसत आहेत. महाराष्ट्रात आज तीव्रता तेवढी दिसत नसली तरी एकप्रकारे ही मोठ्या धार्मिक दंगलींची पूर्वतयारी आहे की काय, असे वाटते. महाराष्ट्रात अलिकडे संघाचे लोक घरोघरी जाऊन मुस्लिमांविरोधात खोटानाटा प्रचार करताना दिसतात. त्यात मुसलमानांविरोधात वातावरण पेटविण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो.
सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही. घोषित नसली तरी ‘अघोषित आणीबाणी’ तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनवले जात आहे. वातावरणात परस्पर अविश्वास व जाती-जातीत, धर्माधर्मात ‘भया’चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपा आणि त्यांच्या अनेक संघिय शाखा पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात आहे, हा यातील सर्वांत दुर्दैवी भाग आहे.
नुकताच घडून आलेला बांगलादेश हिंसाचार, तेथे अल्पसंख्य केवळ हिंदू आहेत, म्हणून भारतीय अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम समुदायाला भयभीत करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या नावाखाली आक्रमक मोर्चे काढले जात आहेत.
आजसुद्धा बहुसंख्य समाज भ्रमात आहे व खोट्या, विषमतावादी, अन्य धर्मांचा द्वेष करणाऱ्या लोकांच्या प्रचाराला बळी पडतो. आजकाल त्यांनी ही मोहीम जोरात सुरु केली आहे की मुसलमान वाईट आहेत, त्यांच्यापासून धोका आहे इ. खरं म्हणजे बहुसंख्य मुस्लिम गरीब आहेत, त्यांना सर्वात कमी नोकऱ्या आहेत, सत्तेमधे त्यांचे स्थान सर्वात कमी आहे, म्हणजे त्यांना सर्वात कमी अधिकार आहेत.
उदा.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या २८८ आमदारांत केवळ १० आमदार मुस्लिम आहेत,
तर प. बंगाल मधे – ४२, उ.प्रदेशात -३४, बिहारमधे -१८
राजस्थानात – ६, तामिळनाडूत -६,
म. प्रदेशात – २.
तर लोकसभेतील मुस्लिम खासदार –
भाजप ०, काँग्रेस-९,तृणमूल-५
समाजवादी-४, मुस्लिमलीग -३,
जम्मू काश्मीर, काँग्रेस-२, एमआयएम १, अपक्ष २.
भाजप हा पक्ष मुस्लिमांशी कसा व्यवहार करतो तेसुद्धा या आकड्यांवरून लक्षात येते. म्हणजे संघ – भाजपचे लोक जो मुस्लिमविरोध करतात, त्यामागे ही भूमिका आहे की सत्तेत त्यांचे अस्तित्वच नको आणि हे आकडे हेही सांगतात की, आताच्या लोकसभेत सर्वात कमी मुस्लिम खासदार आहेत. देशाच्या लोकसंख्येत १४ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या या समुदायाचे ४ टक्केच खासदार आहेत.
एकूण, पाहीले तर लोकसभेत २४ मुस्लिम खासदार म्हणजे केवळ ४.४ टक्के आहेत. लोकसभेत काँग्रेसमधे मुस्लिम खासदारांच्या संख्येत वाढ झाली आहे, परंतु तरीही त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने ती कितीतरी कमी आहे. हे वास्तव असताना ते कुणाचे तरी वाईट करू शकतात का?
अनु. जाती /जमातीचे आमदार, खासदार त्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहेत. अर्थात, त्या त्या घटकाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत, १५ टक्के अनु. जातीचे आणि ८ टक्के आदिवासी. परंतु १४ टक्के मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व त्यांच्या संख्येच्या एकपंचमअंश एवढेच म्हणजे ४ टक्के आहे.
भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसण्यापूर्वी मोघलांची सत्ता जवळपास ८०० वर्षे होती, तेव्हा इथले लोक मुस्लिम झाले नाही वा त्यांनी जबरदस्ती केली नाही, किंवा, १५० वर्षे ब्रिटिशांची सत्ता असताना इथले लोक ख्रिश्चन झाले नाहीत. म्हणजे एवढा काळ सत्ता असतांना त्यांची भीती नव्हती आणि हिंदूंचे राज्य असतांना आताच मुस्लिमांची भीती का सांगत आहेत?
हा एक डाव आहे, कट आहे. हिंदु – मुस्लिम विभाजन करून संघ – भाजपला सामाजिक भेदकारी विकृती पसरवायची आहे आणि लोकांचे लक्ष खऱ्या समस्या वरून दुसरीकडे भरकटवायचे आहे. म्हणजे आज मुस्लिमांकडे कुठलीही राजकीय वा अधिकारिक शक्ती नसतांना त्यांच्यापासून भीती आहे अशी हाकाटी का पिटल्या जाते? का त्यांना वेठीस धरण्यात येत आहे? साधारण विचार करणाऱ्या माणसालाही यात खोटेपणा दिसून येईल.
मुस्लीम लोकसंख्येच्या वाढीचा वेग अत्यधिक असल्याने लवकरच मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल आणि मग हे मुस्लीम हिंदूंचे निर्दयतेने दमन करतील, अशी भीती निर्माण करण्याचेही उद्योग सातत्याने केले गेले आहेत. असे प्रयत्न करण्यात अनेक (Hindu Samaj) हिंदुत्ववादी विचारवंतांचाही सहभाग असतो. जनगणनेच्या आकडेवारीचे निरीक्षण केले असता, या दोन्हीही समुदायाच्या वाढीच्या वेगांधील फरक उत्तरोत्तर कमी होत असल्याचेही दिसत आहे.
मुस्लिम जन्मदर ४.४ वरून २.६ वर आलेला आहे , घट १.८
हिंदूचा जन्मदर ३.३ वरून २.१ वर आलेला आहे , घट १.२
ख्रिश्चन जन्मदर २.९ वरून २ वर आलेला आहे , घट ०.९
बौद्ध धर्मिय जन्मदर २.९ वरून १.७ झालेला आहे, घट १.२
शिखांचा जन्मदर २.४ वरून १.६ झालेला आहे , घट ०.८
जैनांचा जन्मदर २.४ वरून १.२ झालेला आहे , घट १.२
या जन्मदर घटण्याचा सोपा अर्थ असा आहे कि १९९२ च्या तुलनेत २०१५ मध्ये लोकसंख्या वाढीचा वेग सगळ्यात कमी मुस्लिमांचा आहे आणि सगळ्यात जास्त शिखांचा आहे.
सगळा देश इस्लामिक होऊ घातलेला आहे, हिंदू धर्म खतरेमे आहे या हाकाट्या किती भंपक आहेत आणि या पिपाण्या कश्या पिचक्या आहेत हेच या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.मुस्लिमांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांच्याद्वारे व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियेचे एक सामान्य स्वरूप म्हणजे त्यांच्यात निर्माण होणारे भय. त्याचाच परिणाम म्हणून एकटे दुकटे मुस्लीम कुटुंब कोणत्याही हिंदू वस्तीत राहण्याचे धैर्य दाखवत नाही, आणि हीच बाब हिंदू ना सुद्धा लागू होते.
१९९३च्या मुंबई दंगलीनंतर कित्येक मुस्लीम कुटुंबीयांनी (Hindu Samaj) हिंदूंच्या सोसायटीचा त्याग केल्याचे आपण पाहिले आहे. या असुरक्षिततेच्या भावनेतून भय आणि भयातून अविचार निर्माण होणे समर्थनीय नसले, तरी असे होते, हे मात्र खरे. या अविचारातून मुस्लिमांमधील, विशेषतः मुस्लीम युवकांमधील संयम संपून जाऊन त्यांच्या हातून काही अविचारी कृती घडतात. अशा कृतींचे भांडवल करायला हिंदू जातीयवादी तयारच असतात. थोडक्यात, हिंदू-मुसलमानांच्या क्रिया-प्रतिक्रियांमधून या दोन समुदायांमध्ये वैमनस्याचे दुष्टचक्र कार्यरत राहते. ते भेदल्याशिवाय हिंदू-मुस्लीम प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही, हे निश्चित.
सबब, भारतात मुस्लीम समाजाविषयी नाहक द्वेष निर्माण केला जात आहे, त्याला सक्रीय सहभागातूनच आळा घालणे शक्य होईल!
याला प्रतिकार म्हणून जर ब्राह्मणांनी एका काळामध्ये याप्रकारे दलित समाजाच्या लोकांच्या मागे झाडू लटकवणे, गळ्यामध्ये थुंकण्या करीता मटका बांधणे, दलित समाजाच्या महिलांना चोळी घालण्यास मज्जाव करणे, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश न देणे, विहिरीवर पाणी न भरू देणे, अशा पद्धतीची जी अनेक अमानुष काम केली त्याचा पुनरुच्चार जर केल्या गेला तर मग त्याचे परिणाम भोगण्यास भाजपा किंवा तथाकथित हिंदू नेतृत्व तयार आहे का? हा खरा प्रश्न आहे.
लेखक: प्रकाश पोहरे
संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश, साप्ताहिक कृषकोन्नती
प्रतिक्रिया देण्यासाठी 98225 93921 वर ‘थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’ प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.