बांगला देशातील हिंदुवरील अत्याचाराचा केला एकमुखी निषेध
गडचिरोली (Hindu Nyay Yatra) : देशाशेजारील बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदु समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात आज १० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरात काढण्यात आलेल्या न्याय यात्रेत जिल्ह्यातील हिंदु समाज एकवटला होता. चंद्रपूर मार्गावरील देवकुले मैदानात आयोजित निषेध सभेत बांगलादेशात अल्पसंख्याक (Hindu Nyay Yatra) हिंदु समाजावर केल्या जात असलेल्या घटनेचा एकमुखी निषेध करण्यात आला.
बांगलादेशात हिंदु समाजावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात न्याय यात्रा
सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघसह विविध हिंदुत्व संघटनानी एकत्रित येत धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणातून न्याय यात्रा काढली. ही न्याय यात्रा विविध घोषणा देत शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत चंद्रपूर मार्गावरील देवकुले मैदानात पोहचली. या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संघचालक जयंत खरवडे, माजी आ. डॉ. देवराव होळी, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, किर्तनकार सविता खरवडे, प्रमुख वक्ते साकेत भानारकर, कुष्णनगर येथील इस्कान मंदिराचे परमेश्वरदास, हरणघाट येथील मुर्लीधर महाराज, आरएसएसचे जिल्हा कार्यवाहक अविनाश तालापेल्लीवार, गुरूसिंघ सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, सिंधी समाजाचे किसन नागदेवे, आर्य वैश्य समाजाचे प्रशांत तम्मेवार, बंजारा समाजाचे गोवर्धन चव्हाण, प्रकाश अर्जुनवार, माळी समाज संजय शेंडे, गानली समाज संघटनेचे प्रकाश तोडेवार, वंजारी समाजाचे व्हि. बि. गोरे, भोई समाज संघटनेचे सुनिल बावणे, तेली समाजाचे भांडेकर, शिख समाजाचे मंगलसिंग पटवा, गजानन डोंगरे, मादगी समाजाचे देवाजी लाटकर, मातंग समाजाचे ज्ञानेश्वर बावणे, सोनार समाज अध्यक्ष राकेश इनकने, कोहळी समाज संघटना व इतर जाती, जनजाती समुहाचे अध्यक्ष व सकल हिंदू समाज गडचिरोली जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बांगलादेशात अल्पसंख्याक (Hindu Nyay Yatra) हिंदु समाजावर होणाऱ्या अन्यायाचा तिव्र निषेध करून यापुढे असाप्रकार सहन करणार नाही असा ईशारा दिला. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी हजारो हिंदु समाजबांधव सहभागी झाले होते. अनुचित घटना घडू नये म्हणुन पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हिंदु बांधवावरील निषेधार्थ सिरोंचात कडकडीत बंद
सिरोंचा: हिंदुवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिरोंचा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बांगलादेशातील समाज कंटाकावर कारवाईची मागणी करत सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघसह विविध (Hindu Nyay Yatra) हिंदुत्व संघटनानी एकत्रित येऊन येथील तहसील कार्यालयावर भव्य निषेध रॅली काढली. सदर रॅलीचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नरसिंगराव सिलव्हेरी, शंकर नरहरी यांनी केले. शहरातील अय्यपा मंदिरापासून निषेध रॅलीची सुरुवात झाली. विविध घोषणा देत सिरोंचा शहरातील मुख्य चौकातून काढण्यात आलेली रॅली तहसील कार्यालयावर धडकली. त्यानंतर निषेध रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या सभेत भाजप नेते दामोधर अरगेलवार यांनी मार्गदर्शन केले.