दुचाकीवरून आलेल्या 3 चोरट्यांनी दिवसा ढवळ्या चार गावांत पाच घरे फोडली…!
औंढा नागनाथ/हिंगोली (Hingoli Crime) : तालुक्यातील गोजेगाव, येळी, हिवरखेडा, रामेश्वर येथे भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हैदोस घालून घरफोडी करून ११ लाख २० हजार रूपयाचे दागिने चोरून नेल्याने औंढा नागनाथ पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ तालुक्यात ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २.२० दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा येळी, हिवरखेडा, रामेश्वर व गोजेगाव येथे घरफोडी करून पोलिस यंत्रणेला आव्हान दिले आहे.
औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या चोरट्यांनी गोजेगाव येथील सतिष भानुदास सांगळे यांच्या घरातून १ लाख ८० हजाराची गहू मन्याची ३ तोळ्याची सोन्याची पोत, २ लाख ४० हजार रूपयाचे दोन सोन्याचे मिनी गंठण, २ लाख ४० हजार रूपयाचे दोन सोन्याचे नेकलेस, १ लाख २० हजार रूपयाचे दोन सोन्याचे जोडवे, झुंबर व नगदी ९० हजार रूपये तसेच गंगाधर गणपतराव सांगळे यांच्या घरातून ६० हजार रूपयाची एक तोळ्याची सोन्याची एकदानी, १ लाख ९० हजार रूपयाचा २८.२७० ग्रॅम सोन्याचा नेकलेस असा एकूण ११ लाख २० हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी घराचा कडीकोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरून नेले.
सुमारे ११ तोळे सोने व रोख रक्कम लंपास, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी तात्काळ अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. यांच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे व पांडूरंग राठोड, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर पायघन, निरंजन नलवार, गजानन पोकळे हे पथकही त्यांच्यासोबत घटनास्थळी गेले होते.
नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
या पथकाने घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर ८ ऑगस्टला मध्यरात्री ३.३६ वाजता सतिष सांगळे यांनी औंढा नागनाथ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरे हे करीत आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने औंढा ना.व गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी रवाना करण्यात आले आहे. औंढा नागनाथ तालुक्यात घरफोडी केलेल्या या चोरट्यांनी यापूर्वी परभणी व जालना जिल्ह्यातही अशाच पद्धतीचे गुन्हे केले असल्याचे तपासात उघड झाल्याने पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.
पोलिसांची उडाली झोप
औंढा ना.तालुक्यात तब्बल चार गावात चोरट्यांनी हैदोस घालून ऐवज नेल्याने पोलिसांची झोप उडाली आहे.
जिल्ह्यात सतर्कता
या चोरट्यांनी चोर्या केल्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणीही नागरिकांनी सतर्क राहण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे.