हट्टा/हिंगोली (Hingoli Accident) : येथील बस थांब्यावर गुरूवारी सकाळच्या सुमारास जवळा बाजारकडे जाण्याकरीता निघालेला प्रवासी बसमध्ये चढत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने चाकाखाली सापडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हट्टा येथील केशवराव घोंगडे (५७) हे ११ जुलै गुरूवार रोजी जवळा बाजार येथे जाण्यासाठी बस थांब्यावर आले होते. यावेळी परभणी येथून (Hingoli Bus) हिंगोलीकडे जाणारी बस थांब्यावर येताच ते बसमध्ये चढत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन खाली पडले. याच (Hingoli Accident) दरम्यान चालकाने बस पुढे नेली असता केशवराव घोंगडे यांच्या दोन्ही पायावरून बसचे चाक गेल्याने त्यांच्या पायाचा चुराडा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
याचवेळी शाम रोकडे यांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला बोलावून रूग्णवाहिकेद्वारे परभणी येथे उपचाराकरीता डॉ.पांचाळ व चालक मुटकुळे यांनी दाखल केले; परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या (Hingoli Accident) अपघाताची माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार गणेश सूर्यवंशी, महेश अवचार यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. दरम्यान, हट्टा येथे अनेक बसेस थांबा घेत नाहीत. (Hingoli Bus) काही बसेस केवळ उतारू प्रवासी सोडून निघून जाण्याची घाई करतात. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये जाण्याकरीता धावपळ करावी लागत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडत आहेत.