एक ठार, तीन जखमी
हिंगोली (Hingoli Accident) : तालुक्यातील संतुक पिंपरी शिवारात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास भरधाव पिकअपने स्विफ्ट डिझायर कारला धडक दिल्याने त्यात मनविसे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे याचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये तीघे जण जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, (Hingoli Accident) हिंगोली शहरातील एनटीसी भागामधील अजिंक्य पंढरीनाथ घुगे (३१) हा त्याचा वारंगा फाटा येथील मित्र दत्ता पारडकर आणि हिंगोलीतील निखिल पोले याच्यासोबत ११ मार्च मंगळवार रोजी कार क्रमांक एम एच २९ बीसी ५३३१ यामधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होता. संतुक पिंपरी शिवारात रात्री ९ च्या सुमारास भरधाव वेगात येणारा पिकअप क्रमांक एमएच ४६ बीएम ३१३६ च्या चालकाने कारला धडक दिली. ज्यामध्ये पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. हा अपघात ऐवढा भीषण होता की, कारचे इंजीन मोडून बाहेर पडले.
या (Hingoli Accident) अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, जमादार सुधीर ढेंबरे, अस्लम गारवे, आकाश पंडीतकर, आशिष उंबरकर, रमेश जाधव यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिका व पोलिसांच्या वाहनातून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी अजिंक्य घुगे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. यावेळी दत्ता पारडकर व निखील पोले या दोन्ही जखमींवर डॉ. नंदकिशोर करवा यांच्यासह डॉक्टरांनी उपचार करून पुढील उपचाराकरीता नांदेडला हलविण्यात आले.
१२ मार्च बुधवार रोजी सकाळी अजिंक्य घुगे याचे शवविच्छेदन केले मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या मृतदेहावर हिंगणी येथे सकाळी अंत्यसंस्कार करण्यात पत्नी, आई, दोन भाऊ, भावजय, बहिण असा परिवार आहे. या (Hingoli Accident) अपघाता संदर्भात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत अजिंक्य घुगे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ बंडू कुटे याचा भाचा होता.