26 जुलैला जिल्हा परिषदेवर मोर्चा
हिंगोली (Hingoli Anganwadi ) : अंगणवाडी कर्मचार्यांच्या (Anganwadi worker) अनेक मागण्यांसाठी शासनस्तरावर निवेदन देऊन सुद्धा मागण्या मंजूर होत नसल्याने १५ जुलै पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत डिसेंबर २०२३ चर्चा शासनस्तरावर सुरू असून तडजोड न झाल्याने अंगणवाडी कर्मचार्यांनी ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत संप पुकारला होता. २५ जानेवारीला या संदर्भात बैठक घेण्यात आली. अनेक वेळा बैठकांवर बैठका घेण्यात आल्या.
त्यामध्ये कर्मचार्यांच्या काही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली; परंतु महत्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. विधान सभेच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता असून त्याची निवडणूक आदर्श आचार संहिता १५ सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.
हा निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi worker) मानधनापासून वंचित राहू शकतील. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यापासून मासिक अहवाल न देणे, एवाय २० ए योजनेव्यक्तीरिक्त इतर शासनाच्या बैठकांमध्ये हजर न राहणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामामाध्ये असमर्थता दाखविणे आदी मार्गाने असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या कार्यालयासह जिल्हा परिषदांवर तीव्र निदर्शने केल्यानंतर अन्न सत्याग्रह, बेमुदत धरणे, साखळी उपोषण, जेलभरो आंदोलन आदी आंदोलनाचा मार्ग स्विकारला जाणार आहे. तसेच २६ जुलैला जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी १.३० वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशालेजवळून मोर्चा काढला जाणार आहे. या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्यसंघटक दता देशमुख, प्रदेश सचिव नेताजी धुमाळ, रा.का.सदस्य सिंधू ठाकुर यांच्या स्वाक्षर्या आहेत.