जिल्ह्यात 9 लक्ष 84 हजार 764 मतदार नोंद
हिंगोली (Hingoli Assembly Election) : एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोग वेळोवेळी विविध मोहिमांच्या माध्यमातून मतदारांची नावनोंदणी करून घेत आहे. निवडणूक आयोग विविध ऑनलाईन ॲप, विशेष शिबिरांचे आयोजन, स्वीप कार्यक्रम, निवडणूक आयोगाच्या एनव्हीएसपी संकेतस्थळांच्या माध्यमातून जिल्ह्यात 10 हजार 223 मतदार नावनोंदणी झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची (Hingoli Assembly Election) आदर्श आचासंहिता जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून लागू झाली असून, या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नरत आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात तब्बल 10 हजार 223 मतदार वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यात महिलावर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असून, 30 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्ह्यात 4 लक्ष 68 हजार 376 महिला मतदारांची संख्या होती. त्यात 30 ऑक्टोबरपर्यंत 5 हजार 985 म्हण्जे जवळजवळ 6 हजार मतदार वाढले आहेत. तर पुरुष मतदारांमध्ये 4 हजार 238 ची वाढ झाली आहे. इतर मतदारांमध्ये कोणताही बदल झाला नसून ते 10 आहेत. तसेच मतदान केंद्रसंख्या ही 1015 असल्याचे दिसून येते.
92-वसमत विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 63 हजार 613 मध्ये 1318 पुरुष मतदारांची वाढ झाली असून, 1 लक्ष 64 हजार 931 एवढे पुरुष मतदार झाले आहेत. तर महिला मतदारांमध्ये 1 लक्ष 53 हजार 872 वरून 1 लक्ष 55 हजार 828 म्हणजे 1956 स्त्री मतदार वाढले असून आता 3 लक्ष 20 हजार 765 मतदार वसमत विधानसभेला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
93 –कळमनुरी विधानासभा मतदारसंघात तब्बल 4 हजार मतदार वाढले असून, यामध्ये 1702 पुरुष मतदारांमध्ये वाढ झाली आहे. 30 ऑगस्टपर्यंत या मतदारसंघात 1 लक्ष 70 हजार 235 होते तर आता 1 लक्ष 71 हजार 937 झाले आहेत. तर स्त्री मतदारांमध्ये 2 हजार 298 निव्वळ वाढ झाली आहे. 30 ऑगस्टपर्यंत 1 लक्ष 56 हजार 449 स्त्री मतदारसंख्या होती त्यात वाढ होऊन आता 1 लक्ष 58 हजार 747 झाले आहेत. तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत 3 लक्ष 30 हजार 686 इतकी झाली असून, 345 मतदान केद्रांच्या माध्यमातून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तसेच 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये (Hingoli Assembly Election) 2 हजार 949 इतकी मतदारसंख्या वाढली असून, या निवडणुकीमध्ये 3 लक्ष 33 हजार 313 स्त्री-पुरुष मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या मतदारसंघात 30 ऑगस्टपर्यंत 1 लक्ष 72 हजार 307 पुरुष तर 1 लक्ष 58 हजार 55 स्त्री मतदार होत्या. त्यामध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत वाढू होऊन अनुक्रमे 1 लक्ष 73 हजार 525 पुरुष तर 1 लक्ष 59 हजार 786 स्त्री मतदार नोंदविले गेले आहेत. यामध्ये 1218 पुरुष आणि 1731 स्त्री मतदारांची निव्वळ वाढ नोंदवली गेली असून, 343 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्ह्यात तिनही मतदारसंघात एकूण 5 लक्ष 10 हजार 393 पुरुष तर 4 लक्ष 74 हजार 361 स्त्री मतदार असून, इतर मतदार कायम (10) आहेत. जिल्ह्यात 92-वसमत 3 लक्ष 20 हजार 765, 93-कळमनुरी 3 लक्ष 30 हजार 686 आणि 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघात 3 लक्ष 33 हजार 313 असे एकूण 9 लक्ष 84 हजार 764 मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यास हातभार लावू शकणार आहेत.