हिंगोली (Hingoli Assembly Election) : जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदार व एका माजी आमदारांसह एकूण ५ इच्छुक उमेदवारांनी गुरूपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केले. आज गुरूवारी सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन करीत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये प्रचंड जनसमुदाय सोबत होता. विशेष म्हणजे एखाद्या निवडणुकीतल उमेदवाराचा अर्ज दाखल करताना महिलांची सहभागी होण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे मध्यप्रदेशातून आलेले निरीक्षक मुक्काम सिंग हे सुद्धा उपस्थित होते.
हिंगोलीचे (Hingoli Assembly Election) आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह गुरूवारी मुहूर्ताचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ते २७ ऑक्टोंबर रोजी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यात सर्वात अगोदर मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव आले होते. उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने आ.मुटकुळे हे प्रचाराच्या नियोजनात एक पाऊल पुढे आहेत.
काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी पक्षाचे संभावित उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सुद्धा गुरूवारी मुहूर्ताचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीची दिल्लीत शुक्रवारी बैठक होणार असून या बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. महाविकास आघाडीचे चर्चेचे गुर्हाळ सुरू असले तरी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गोरेगावकरांनी सुद्धा मोजक्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला. (Hingoli Assembly Election) हिंगोलीत महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूच्या जवळपास सर्वच नाराजांनी उमेदवारी अर्ज खरेदी करून ठेवले आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत यांच्यातील किती जणांचे अर्ज दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.