हिंगोली (Hingoli Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता कालावधीत उमेदवारांकडून मतदारांना मतदान करण्याबाबत विना परवानगी बल्क एसएमएस देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या उमेदवारांना प्रचारासाठी बल्क एसएमएस किंवा व्हाईस एसएमएस पाठवायचे आहेत, त्यांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची परवानगी घेऊनच एसएमएस पाठविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे बल्क एसएमएस, ई-पेपर, व्हीडीओ, ऑडीओ, रेडीओ चॅनेलवरील कोणत्याही जाहिरातीला परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी शिवाय इलेक्ट्रॉनिक्स फॉरमॅटवरील कोणतीही जाहिरात दिल्यास कारवाई केली जाईल.
रेडिओ संदेश, बल्क एसएमएस बंदी
निवडणूक दिनांकाच्या 48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खासगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. 48 तास आधी मोबाईलवर अशा प्रकारे संदेश आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी एसएमएस सेवा देणाऱ्या एजन्सीची असेल, यांची सर्वानी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.