सौ. रूपाली पाटील गोरेगावकरांची उमेदवारी निश्चित
हिंगोली (Hingoli assembly Election) : हिंगोली विधानसभेची जागा महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना (उबाठा) कडे गेली असून पक्षातर्फे सौ.रूपाली पाटील गोरेगावकर (Rupali Patil Goregaonkar) यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मागील चार दिवसांत निश्चित झाले होते. केवळ महाविकास आघाडीमध्ये हिंगोलीच्या जागेसाठी चर्चेचे गुर्हाळ सुरूच होते. काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या मोठ्या गटबाजीमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते हिंगोलीच्या जागेबाबत प्रारंभीपासूनच फारशे गंभीर नव्हते.
हिंगोलीची जागा ‘दिल्ली ८८’ मध्ये केवळ इतक्यासाठी ठेवण्यात आली होती की, एखाद्या ठिकाणी सोयीची जागा काँग्रेसला घ्यावयाची असेल तर मित्रपक्षाला हिंगोलीची जागा देता यावी. देशोन्नतीचे हे भाकित अखेर खरे ठरले. (Hingoli assembly Election) काँग्रेस पक्षाला नांदेड उत्तरमधून एक मुस्लिम उमेदवार द्यावयाचा असल्याने श्रेष्ठींनी त्या जागेच्या बदल्यात हिंगोलीची जागा सोडणे सोयीचे समजले. विशेष म्हणजे जागा शिवसेनेला सोडल्याचे ठरताच तासाभरातच (Rupali Patil Goregaonkar) सौ.रूपाली गोरेगावकर यांच्या नावाचे एबी फॉर्म देण्यात आले.
याबाबत शिवसेना उबाठाचे हिंगोलीचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सांगितले की, हिंगोलीच्या जागेसाठी शिवसेना प्रारंभीपासून आग्रही होती. (Hingoli assembly Election) हिंगोलीची जागा काँग्रेसकडून घेताना त्या जागेच्या बदल्यात इतर ठिकाणी जागा देण्यात आल्यामुळे या जागा बदलाचा शिवसेना व काँग्रेसच्या संबंधावर काही एक परिणाम होणार नाही. उभय पक्षांसहीत महाविकास आघाडीचे सर्व घटक हिंगोली जिल्ह्यातील आघाडीच्या तिन्ही जागांसाठी परिश्रम घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौ.रूपाली पाटील यांना माहेर आणि सासरचा राजकीय वारसा
धाराशिव जिल्ह्यातील निंबाळकर घराण्याच्या कन्या असलेल्या सौ.रूपाली पाटील यांचे माजीमंत्री राणा जगजीतसिंह व खासदार ओमराजे निंबाळकर हे चुलत बंधू आहेत. त्यांचे सासरे साहेबराव पाटील गोरेगावकर एक वेळ हिंगोलीचे आमदार होते. त्यांचे पती राजेश पाटील गोरेगावकर हे हिंगोली बाजार समितीचे सभापती आहेत. ते यापूर्वी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती होते.खुद्द रूपाली पाटील हिंगोली जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती होत्या.
हिंगोली विधानसभेत पहिल्यांदाच नसेल काँग्रेसचे निवडणूक चिन्ह
हिंगोली विधानसभेचा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून (Hingoli assembly Election) निवडणूकीत काँग्रेसचे चिन्हच नसण्याची ही पहिली वेळ आहे. कधी काळी काँग्रेसचना बालेकिल्ला असलेल्या हिंगोली विधानसभा मतदार संघात बैलजोडी, गाय – वासरू ते हाताचा पंजा असे सगळे निशाण राहीलेले आहेत. ही पहिली निवडणूक असेल ज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे चिन्हच दिसणार नाही.
भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
सहा वेळा हिंगोली विधानसभा निवडणूक (Hingoli assembly Election) लढविलेले व तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या भूमिकेकडे आता सबंध मतदार संघाचे लक्ष लागले आहे. या विधानसभेत अगदी प्रारंभीपासून दोन गोरेगावकरांचे दोन गट चालत आले आहेत. हिंगोली जिल्हा निर्मितीपूर्वी या दोन राजकीय घराण्यांत परभणी जिल्हा परिषदेत दिलजमाई झाली होती. ही फार काळ टिकली नाही. त्यानंतर प्रत्येक वेळी दोन्ही गट आमने – सामने राहीले. (Hingoli assembly Election) हिंगोली विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे तान्हाजी मुटकुळे सलग दुसर्यांदा आमदार झाल्यानंतर दोन्ही गोरेगावकरांत पुन्हा एकदा मनोमिलन झालेले आहे. अशात ऐनवेळी उमेदवारीत झालेल्या या बदलानंतर माजी भाऊराव पाटील गोरेगावकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.