हिंगोली (Hingoli Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेशकुमार बन्सल यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट देत पाहणी केली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी पुष्पा पवार, गणेश वाघ, गजानन बोराटे, जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, समितीचे सदस्य प्राचार्य सुरेश कोल्हे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, माध्यम कक्षातील आशाताई बंडगर, कैलास लांडगे आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत समाज माध्यमांमध्ये येणारे वृत्त वाचन करुन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकी संदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करुन देणे आदी बाबींची माहिती घेतली.
यावेळी प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक विविध आढावा बैठकांचे वृत्त, पत्रकार परिषदांचे आयोजन, वृत्तपत्रांतील वृत्ताचे संकलन करून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे, निवडणूकविषयक बातम्यांबाबत अहवाल तयार करून तो भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.
जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन पाहणी केली. पथक प्रमुख ग. गो. चिथळे यांनी जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाकडे 1950 हा निशुल्क दूरध्वनी क्रमांक आहेत. हे संपर्क व तक्रार निवारण केंद्र निवडणूक कालावधीमध्ये 24X7 सुरु असून, तक्रार निवारण कक्षातील कार्यान्वित 1950 या निशुल्क क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती दिली. निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव व निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ.राकेशकुमार बन्सल यांनी येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत निवडणूक कालावधीत या कक्षाने अधिक सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या.