पथकामार्फत घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया
आजी-आजोबांनी केले मतदान
हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणूक निमित्ताने तिन्ही मतदार संघातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन पथकामार्फत मतदान करून घेण्यात आले. निवडणूक विभागाने या राबविलेल्या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, वसमत, हिंगोली या (Hingoli Assembly Elections) तीन विधानसभा मतदार संघात ९ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकासह दिव्यांगानी आपापल्या पसंतीमधील उमेदवारांना मतदान केले. या मतदान प्रक्रियेकरीता तिन्ही विधानसभा मतदार संघात अनेक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक विभागाने गृहभेटीतून मतदान सुविधेमुळे मतदान करण्याचा आनंद अनेकांच्या चेहर्यावर झळकला.
हिंगोली विधानसभा मतदार संघात (Hingoli Assembly Elections) ४४९ दिव्यांग व वयोवृद्ध मतदार आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघात ५६ दिव्यांग मतदार व ८५ वर्षापेक्षा अधिक वयाचे २५० मतदार आहेत. वसमत विधानसभा मतदार संघात ५६ दिव्यांग मतदार तर ८५ वर्ष वयोगटातील २४५ मतदार आहेत. ९ नोव्हेंबर पासून गृहभेटीतून हे मतदान करून घेतले जात आहे.