हिंगोली (Hingoli Assembly elections) : मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या 20 नोव्हेंबर, 2024 ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करावे. यासाठी मतदार जनजागृती करण्यासंदर्भात जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच अनुषंगाने जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संदीप कुमार सोनटक्के आणि प्रशांत डिग्रसकर यांच्या नेतृत्वात जिल्हा स्वीप प्लॅन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे आदी उपस्थित होते. स्वीप प्लॅन तयार करण्यासाठी स्वीपचे जिल्हा समिती सदस्य विजय बांगर, बालाजी काळे, दीपक कोकरे आणि हनुमान गिराम यांनी काम केले.