हिंगोली(Hingoli) :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बहुतांशी महिलांच्या बँक व डाक विभाग खात्यावर रक्कम जमा झाली आहे. यापूर्वी बँकेमध्ये महिलांची मोठी गर्दी होत होती. डाक विभागात खाते उघडल्यावर लवकर रक्कम जमा होते. या चर्चेने आता बँकेची (Bank)गर्दी ओसरून डाक विभागात महिलांची गर्दी वाढली आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यास आपल्या पैशाचे काय? महिलांना धास्ती
जुलै महिन्यापासून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Laadki Bahin Yojna)ही योजना अंमलात आणली. पहिल्यांदा दोन महिन्याचे ३ हजार रूपये महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले. विशेष म्हणजे अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज करताना ज्या बँकेचे खाते दिले होते त्या खात्यात ही रक्कम जमा न होता अन्य बँकेत रक्कम जमा झाल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. त्यामुळे महिलांना दुसर्या बँकेत जाऊन रक्कम जमा झाली की नाही याच पडताळणी करावी लागली. विशेष म्हणजे हिंगोलीतील स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)शाखेमध्ये बहुतांशी महिलांचे बँक खाते असल्याने त्याच ठिकाणी प्रत्येक दिवशी महिलांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे दिवसभर बँक कर्मचार्यांना या योजनेतील महिलांनाच प्राधान्यक्रम द्यावा लागत होता. आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून येत्या अवघ्या दिवसात आदर्श आचार संहिता लागणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. जिल्ह्यात ३ लाख १३ हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर महिला बालविकास विभागाने जिल्हास्तरावर छाननी करून ३ लाख ७ हजार महिलांचे प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविले होते.
३ लाख ७ हजार महिलांचे प्रस्ताव मंजूर
अद्याप २९ हजार महिला या योजने पासून वंचीत आहेत. बँकेत खाते असूनही रक्कम आली नसल्याने आता अनेक महिला डाक विभागात खाते उघडत आहेत. त्यामुळे डाक विभागात महिलांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. या ठिकाणी ३ ते ४ कर्मचारी नवीन खाते उघडण्याकरीता नियुक्त करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करताना ज्या बँकेचे खाते जोडले त्यात पैसे आले नाही भलत्याच खात्यात महिलांचे पैसे जमा झाले तर काही महिलांचे बँकेत पैसे आले नसल्याने आता डाक विभागात खाते उघडण्याकरीता महिलांची गर्दी होत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आधार लिंक करण्याचे आवाहन
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, या योजनेमध्ये जिल्ह्यातील महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यानुसार महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा स्तरावरून महिलांचे प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये महिलांचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटोसह प्रस्तावाचा समावेश आहे. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटीद्वारे दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम दिली जात आहे; परंतु पात्र महिलेच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांचे खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. यापूर्वी देखील महिलांचे बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या पात्र महिलांनी अद्यापही बँक खात्याशी आधार लिंक केलेले नाहीत, त्या महिलांनी लवकरात लवकर बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.