हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळद व सोयाबीनची आवक होत असली तरी त्याचे दर स्थिर असल्याने शेतकरी दर वाढीच्या प्रतिक्षेत आहेत. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये अनेक शेती मालाचा लिलाव केला जातो. बाजार समितीच्या यार्डामध्ये २९ नोव्हेंबर रोजी १२०० पोत्यामधून सोयाबीनची आवक झाली असता त्याला ४ हजार ते ४५५० रूपये असा दर मिळाला आहे. १ हजार पोत्यामधून हळदीची आवक झाली असता त्याला १२ ते १४ हजार ३०० रूपये दर मिळाला आहे. यासोबतच १५० पोत्यामधून गव्हाची आवक झाली होती. गव्हाला २२०० ते ३२०० रूपये दर मिळाला आहे. १०० पोत्यामधून ज्वारीची आवक झाली असता त्याला १८०० ते २३०० रूपये दर मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शेती मालामध्ये दरवाढ होईल अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. निवडणूक दरम्यान महायुतीच्या नेते मंडळींनी सोयाबीनला ६ हजार रूपये दर दिला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे महायुतीच्या नेते मंडळींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करून सोयाबीनला ६ हजार रूपये दर द्यावा अशी मागणी देखील शेतकर्यांतून केली जात आहे.