हिंगोली (Hingoli):- जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण करण्यासाठी आणि लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे प्रमाणीकरण (ई – केवाईसी) करण्यासाठी शासनाने दिलेली बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाईस मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन व्यवस्था विस्कळीत झालेली आहे.
अन्न धान्य वितरण करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात यावी
अनेक स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे प्रमाणीकरण करण्याचे आदेश शासनाने दिलेले असून अशावेळेस कुटुंबातील सर्वच सदस्यांना आधारकार्ड (Aadhaar Card) आणि राशनकार्डसह (Ration Card) राशन दुकानावर जाऊन आपल्या अंगठ्याचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असताना सर्व्हर डाऊन (Server down) समस्येमुळे अनेक कुटुंबांना राशन दुकानावर तासनतास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात निवेदन दिले असून सर्व्हर डाऊन समस्येवर लवकरात – लवकर तोडगा काढण्याचे आणि अन्न धान्य वितरण करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात यावी आणि बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाईस मशीन व्यवस्थित काम करत नसल्याने मॅन्युअल पद्धतीने ऑफलाईन अन्न धान्य वितरण करण्याची मुभा देण्यासाठी विनंती केली आहे.
ऑफलाईन अन्न धान्य वितरण करण्याची मुभा देण्यासाठी विनंती
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणी मुंबई मंत्रालय (Ministry of Mumbai) येथील राज्य स्तरीय अधिकाऱ्यांशी आणि मुंबई एनआईसी टीमशी संपर्क करून लवकरात – लवकर शाश्वत मार्ग काढून आवश्यक उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील, महसूल कर्मचारी अमोल महाजन, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भिक्कुलाल बाहेती, औंढा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र पोले, फारुक पठाण, अशोक काळे, शाहनवाज गौरी पहेलवान, नवनाथ कानबाळे, खरेदी – विक्री संघाचे व्यवस्थापक आसिफ़ गौरी, एल. जी. घुगे मामा, ॲड. एस. एस. ठोंबरे, अमित बांगर इत्यादी उपस्थित होते.