भाजपा पदाधिकार्यांना आला भाव
हिंगोली (Hingoli BJP) : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी पक्षाने ‘बंद लिफाफा’ पध्दत सुरू केल्याने अनेक नेत्यांच्या काळजात धडधड व्हायला लागली आहे. महायुती अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सध्या एकच जागा (Hingoli BJP) भारतीय जनता पक्षाकडे आहे. हिंगोलीच्या या जागेवर आ. तान्हाजी मुटकुळे हे सलग दुसर्यांदा निवडूण आलेले आहेत. यापूर्वीच्या दोन्ही निवडणूकांमध्ये उमेदवारीसाठी त्यांच्यापुढे बारीक – सारीक आव्हाने होती. त्या वेळेला खात्रीने सांगितले जायचे की, उमेदवारीत तर मुटकुळे यांनाच मिळले.
यावेळी मात्र पक्षात दोन इतर नेत्यांनीही आपला दावा मांडला आहे. यामध्ये प्रामुख्याने रामदास पाटील व डॉ. विठ्ठल रोडगे यांचे नाव चर्चेत आहे. रामदास पाटील यांनी मुख्याधिकारी म्हणून प्रशासनातील नौकरीचा राजीनामा देऊन (Hingoli BJP) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना प्रवेश मिळवून देण्यात आ. मुटकुळे हेच आघाडीवर होते. आता हेच रामदास पाटील हिंगोली विधानसभेवर दावा सांगत आहेत. यापूर्वी लोकसभेचे संभावित उमेदवार म्हणून त्यांनी सर्व सहा विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. त्या निवडणूकीत उमेदवारी मिळाली नसल्याने निराश न होता त्यांनी आपले पूर्ण लक्ष हिंगोली विधानसभेवर केंद्रीत केले. लोकसभा निवडणूकीनंतर ते सतत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. पक्षानेही त्यांच्या माध्यमातून निधी देऊन त्यांना ताकद दिली आहे. यामुळे रामदास पाटील यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे.
वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले आणि जिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून अनेक वर्षे सेवा दिलेले डॉ. विठ्ठल रोडगे हे सबंध जिल्ह्याला परिचित आहेत. काही महिन्यापूर्वी डॉ. रोडगे यांनीही वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. सध्या डॉ. विठ्ठल रोडगे हे दर दिवशी ग्रामीण भागात संपर्क दौरे काढत आहेत. एक उच्चशिक्षीत कार्यकर्ता म्हणून पक्ष आपला विचार करील याची त्यांना खात्री आहे. अशात पक्षाने ‘बंद लिफाफा’ पध्दत अवलंबिली. यासाठी नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची नियुक्ती झाल्याचेही वृत्त आहे.
निरीक्षक जिल्ह्यात येऊन (Hingoli BJP) पक्षाच्या पदाधिकार्यांकडून बंद लिफाफ्यात त्यांची पसंती घेतील. हे लिफाफे निरीक्षक वरिष्ठांना पोहचवतील. यावरूनच उमेदवार निश्चित होणार आहे. यामुळे भाजपमधील सर्वच इच्छुक नेत्यांची धडधड वाढली असून पक्षातील पदाधिकार्यांची मात्र आता खुशाली विचारणे सुरू झाली आहे. नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज गुरूवारी हिंगोलीत येत आहेत. पदाधिकार्यांकडून त्यांची पसंती ‘बंद लिफाफ्यात’ घेऊन जाणार आहेत.