हिंगोली(Hingoli):- शहरातील बियाणीनगर भागामध्ये आडत व्यापार्याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून नगदी रकमेसह दागिने असा एकूण १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१ लाख ९२ हजाराची रक्कम व दागिने पळविले
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील बियाणीनगर भागात देवीकांत रावजीराव देशमुख यांचे निवासस्थान आहे. २६ ऑक्टोंबरला सुट्टीमुळे ते कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या मुख्य दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर घरातील साहित्याची नासधूस केली. त्यानंतर या चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन लाकडी कपाटात ठेवलेल्या पर्समधील नगदी १७ हजार रूपये व दीड तोळ्याचा सोन्याचा हार व एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (Gold Rings)असा एकूण १ लाख ९२ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळच्या सुमारास देशमुख यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने नागरिकांना संशय आला. त्याची माहिती देशमुख यांच्यासह हिंगोली शहर पोलिसांना दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सपोउपनि परगेवार, जमादार पोटे, धनंजय क्षीरसागर, अशोक धामणे यांच्या पथकाने भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज(CCTV Footage) पाहणी केली असता एक चोरटा घरात प्रवेश केल्याचे दिसून आले.
या घटनेप्रकरणी देवीकांत देशमुख यांनी हिंगोली शहर पोलिसात २७ ऑक्टोंबरला तक्रार दिली. ज्यामध्ये ७५ हजाराचा दीड तोळे सोन्याचा हार, १ लाख रूपयाच्या सोन्याच्या अंगठ्या, नगदी १७ हजार रूपये असा एकूण १ लाख ९२ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याने अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोउपनि परगेवार हे करीत आहेत.