पालकांसह ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकार्यांनी साधला संवाद
हिंगोली (Hingoli Collector Abhinav Goyal) : जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी निपूण हिंगोली उपक्रमात २७ डिसेंबरला सेनगाव तालुक्यातील वाढोणा जि.प.शाळेला भेट दिली. काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील उत्तरेही देता आली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून शाळेची गुणवत्ता कमी होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. निपूण हिंगोली उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Hingoli Collector Abhinav Goyal) हे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देत आहेत.
त्या निमित्ताने २७ डिसेंबरला वाढोणा जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट दिली. जवळपास दोन तास शाळेच्या अनेक उपक्रमांची पाहणी गोयल यांनी करून विद्यार्थ्यांचे वर्गही घेतले; परंतु शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांना भाषा वाचन व गणितीय क्रिया करता आल्या नाहीत. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकामधील अनेक धड्यांचे उत्तरही बरोबर देता आले नसल्याने (Hingoli Collector Abhinav Goyal) जिल्हाधिकारी गोयल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शाळेची गुणवत्ता कमी असल्याबाबत तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाला दिल्या. विद्यार्थ्यांचे धडे घेतल्यानंतर जिल्हाधिकारी गोयल यांनी उपस्थित पालकांसह ग्रामस्थांसोबत संवाद साधला. चांगले विद्यार्थी घडावे यासाठी शाळा प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने पालक मेळावे घ्यावेत अशाही सूचना देऊन आपले पाल्य गुणवत्ता वाढीसाठी नियमित शाळेत जातील याकडे लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Hingoli Collector Abhinav Goyal) यांच्यासोबत संदीप सोनटक्के व अन्य अधिकारीही उपस्थित होते.