हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli crime) : सेनगाव तालुक्यातील येलदरी टी पॉईंटवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ जनावरांसह १८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल (Hingoli crime) झाला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव भागातून सेनगाव मार्गे एका आयशरमध्ये जनावरांची वाहतूक केली दजात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी तातडीने गुन्हे शाखेचे पथक सेनगाव मार्गावर तपासणीसाठी पाठविले होते.
त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार किशोर कातकडे, सुभाष चव्हाण, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्?वर पायघन, राम मारकळ, शिवाजी इंगोले यांच्या पथकाने मध्यरात्री पासून वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी येलदरी टी पॉईंटवर एक आयशर पोलिसांनी थांबवला. पोलिसांनी चालक शएख अख्तर हमीद अन्सारी यांच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी आयशर टेम्पो वरील ताडपत्री काढून पाहिले असता त्यात जनावरे असल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोलिसांनी सदर टेम्पो व तिघांना ताब्यात घेऊन सेनगाव पोलिस ठाण्यात आणले. सदर जनावरे व टेम्पो असा १८.७० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरील जनावरे तेलंगणा राज्यात नेली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. सेनगाव पोलिसांनी जनावरे हत्ता येथील गोशाळेकडे रवाना केली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिसांनी शेख अख्तर हमीद अन्सारी (रा. मालेगाव, जि. नाशीक), मोहम्मद सय्यद मोहम्मद उमर (रा. नगरदेवला, जि. जळगाव), कुरेश कलीम कय्युम (रा. शिवणा जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह जनावरे भरून देणारा असलम फकीरा शेख (रा. मालेगाव, जि. नाशीक) यांच्या विरुध्द (Hingoli crime) गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष तांबे पुढील तपास करीत आहेत