हिंगोली (Hingoli Crime) : केंद्रीय राखीव दलातील जवान आपल्या कुटुंबासमवेत स्कुटीवरून पावभाजी सेंटरवर आले होते. त्यांच्या स्कुटीच्या डिकीतून ३ लाख ३८ हजाराचे दागिने व नगदी ४० हजार रूपये असा एकूण ३ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याने (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला.
केंद्रीय राखीव दलातील जवान दादाराव सदाशिव कांबळे हे हिंगोलीतील ज्योतीनगरमध्ये वास्तव्यास असून १३ सप्टेंबर रोजी ते आपल्या कुटुंबियासह स्कुटीवरून हिंगोली शहरात आले होते. यावेळी त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून ५ लाख रूपयाची रक्कम काढल्यानंतर त्यातील काही रकमेतून सराफा बाजारातून दागिने घेतले. (Hingoli Crime) उर्वरित रकमेतून त्यांनी बुलडाणा अर्बन बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवून घेतले. यावेळी कुटुंबियासह ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील महावीर वडापाव हॉटेलसमोर दुपारी १ च्या सुमारास आले होते. त्यांनी या ठिकाणी स्कुटी उभी करून ठेवली असता स्कुटीच्या सिटच्या डिकीतील ठेवलेले १ लाख ९२ हजार ८२८ रूपये किंमतीचे ३५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १ लाख ४५ हजार ३५२ रूपयाच्या सोन्याच्या ३ अंगठ्या आणि नगदी ४० हजार रूपये असा एकूण ३ लाख ७८ हजार १८० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने डिकीमधून काढून नेला.
कांबळे हे घरी आल्यानंतर त्यांना स्कुटीची डिकी उघडी दिसली. त्याची तपासणी केली असता दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिल्याने गुन्हा (Hingoli Crime) दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्यास सुरूवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोटे हे करीत आहेत.