वसमत तालुक्यातील धानोरा येथील घटना
हट्टा पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल; एकास पकडले
हिंगोली (Hingoli Crime) : वसमत तालुक्यातील धानोरा येथे व्याजाच्या पैशाच्या कारणातून एका मुलासह त्याच्या वडीलाला मारहाण करून त्याच्या वडीलास जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात धारदार शस्त्र खुपसून गंभीर जखमी केल्याने हट्टा पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील धानोरा येथील बाळू मामाच्या मंदिरा जवळ २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास व्याजाच्या पैशाच्या कारणावरून प्रभाकर राऊत व त्यांचा मुलगा प्रदीप प्रभाकर राऊत या दोघांना आरोपीनी शिवीगाळ करून त्यांचे हात पाठीमागून धरून मारहाण करण्यात आली. यावेळी देवानंद विश्वनाथ हिरवे याने प्रभाकर राऊत यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू सारख्या धारदार शस्त्राने पोटात खुपसून गंभीर जखमी करून तेथून पलायन केले. त्यानंतर प्रभाकर राऊत यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याप्रकरणी २९ नोव्हेंबरला हट्टा पोलीस ठाण्यात प्रदीप राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवानंद विश्वनाथ हिरवे, विश्वनाथ संभाजी हिरवे रा.धानोरा ता.वसमत, योगेश खनपट्टे रा.वांगी जि.परभणी या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.यु.जाधव यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जी.केंद्रे करीत आहेत.