हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल, सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील घटना
हिंगोली (Hingoli Crime) : सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे लग्न पत्रिका वाटप करण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला धडक देऊन मृत्यूस (Hingoli Crime) कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून एकास ७ वर्ष सश्रम कारावास व ५५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय (Hingoli District Courts) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एन. माने गाडेकर यांनी २३ सप्टेंबर रोजी सोमवारी दिला आहे.
याबाबत सहाय्यक सरकारी वकिल ॲड. एस. डी. कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील सुभाष अर्जून देवकर व यलप्पा अर्जून देवकर हे त्यांच्या दुचाकी वाहनावर ११ मे २०१९ रोजी लग्न पत्रिका वाटप करण्यासाठी सेनगावकडे निघाले होते. यावेळी वटकळी येथील शिवाजी किशन संत याने त्याच्या ताब्यातील हायवा टिप्परने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये सुभाष देवकर यांचा मृत्यू झाला तर यलप्पा देवकर गंभीर जखमी (Hingoli Crime) झाले होते.
या प्रकरणी बळीराम देवकर यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी संत याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला होता. सेनगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या पथकाने अधिक तपास करून (Hingoli District Courts) हिंगोलीच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी शिवाजी संत यास सात वर्ष सश्रम कारावास व ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ॲड. एस. डी. कुटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. एन. एस. मुटकुळे, ॲड. सविता देशमुख यांनी सहकार्य केले. जमादार मुनीर मुन्नीवाले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.