वारंगा फाटा प्रकरण, हिंगोली न्यायालयाचा निकाल
हिंगोली (Hingoli Crime) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे वनरक्षकास शिवीगाळ करून शासकिय कामात अडथळा आणणाऱ्या एकास तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय (Hingoli Crime) जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांनी शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दिला आहे.
याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एस. डी. कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या वारंगाफाटा उद्याना समोर निलेश गजानन पतंगे (रा. वारंगाफाटा) याने ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मोटरसायकल उभी केली होती. सदर मोटरसायकल प्रवेशद्वारासमोरच असल्याने वनरक्षक संतोष कचरे यांनी सदर मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगितले. मात्र यावेळी निलेश याने त्यांना शिवीगाळ करून शासकिय कामात अडथळा आणला होता.
या प्रकरणी संतोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी निलेश पतंगे याच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एच. डी. नकाते यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. (Hingoli Crime) सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते.
या प्रकरणात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी निलेश यास तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एस. डी. कुटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. एन. एस. मुटकुळे, ॲड. सविता देशमुख यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार सुनीता धवने यांनी काम पाहिले.