हिंगोलीत पीकविमा कार्यालयात तोडफोड
हिंगोली (Hingoli Crop insurance) : शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याने हनुमाननगर भागातील (Crop insurance) पीकविमा कंपनीच्या कार्यालयात संतप्त शेतकर्यांनी प्रवेश करून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना सोमवारी घडली. रब्बी २०२३ च्या हंगामाचा पीकविमा काढण्याकरीता राज्य शासनाने एचडीएफसी जनरल इन्युरन्स कंपनीची हिंगोली जिल्ह्यासाठी नियुक्ती केली होती. हरभरा पिकाचा हजारो शेतकर्यांनी पीकविमा काढला होता.
कर्मचार्याने कार्यालय सोडून ठोकली धुम
नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्यांनी (Crop insurance) पीकविमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. रब्बी हंगामाचा पीकविमा मिळावा या मागणीसाठी तसेच तक्रार करूनही पीकविमा मिळत नसल्याने अनेक शेतकर्यांनी ८ जुलै रोजी हनुमाननगरातील पीकविमा कार्यालयात जाऊन कर्मचार्याकडे विचारणा केली. परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने संतप्त शेतकर्यांनी कार्यालयातील खुर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली. शेतकर्यांचा संताप पाहताच कर्मचार्यानेही कार्यालय सोडून धुम ठोकली होती.