हिंगोली (Hingoli District Hospital) : जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात रूग्णासह नातेवाईकांनी आणलेली वाहने उभी करण्या करीता वाहनतळ उभारण्यात आलेले आहे; परंतु चालक मात्र वाहन तळात वाहने उभी करण्याऐवजी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासह आजुबाजूला वाहने उभी करून बेशिस्तीचे दर्शन घडवित आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयाची टोलेजंग इमारत उभारण्यात आलेली आहे. कोट्यावधी रूपयाच्या रकमेतून अनेक कामे करण्यात आलेली आहेत.
या (Hingoli District Hospital) रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर दुचाकी वाहने उभी करण्याकरीता रूग्णालय प्रशासनाने दोन सुसज्ज वाहनतळ उभारली आहेत. याच ठिकाणी वाहने उभी करणे क्रमप्राप्त असताना रूग्णालयात येणार्या रूग्णांच्या नातेवाईकासह इतर नागरीक मात्र वाहनतळामध्ये वाहने उभी करण्याऐवजी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर व इमारतीच्या आजुबाजूला वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे रूग्णालयात कधी कधी रूग्णांना नेताना या दुचाकी वाहनाच्या मधून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालय प्रशासनाने उभारलेल्या वाहन तळावरच वाहने उभी करण्यासाठी सक्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कडक कार्यवाहीची नितांत गरज
मागील काही वर्षापूर्वी अशाच बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचा सपाटा चालकांनी लावला होता. त्यामुळे (Hingoli District Hospital) रूग्णालय प्रशासनाने अधुनमधून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलावून दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अधुनमधून दंडात्मक कार्यवाही केली जात होती. यासाठी आताही रूग्णालय प्रशासनाने अशीच दंडात्मक कार्यवाही करण्याकरीता ठोस पावले उचलावीत अशीच मागणी होत आहे.