हिंगोली(Hingoli):- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणार्या गुणांकनांनुसार हिंगोलीचे जिल्हा रुग्णालय (District Hospital) मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असून राज्यात पाचव्या स्थानावर आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांचे कौतुक केले जात आहे.
राज्यभरातील शासकीय आरोग्य यंत्रणांचे गुणानुक्रम जाहीर केले
महाराष्ट्र आरोग्य सेवेचे(Maharashtra Health Services) आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे अभियान संचालक धिरजकुमार यांनी नुकतेच राज्यभरातील शासकीय आरोग्य यंत्रणांचे गुणानुक्रम जाहीर केले आहे. हे गुणानुक्रम जाहीर करताना संबंधित जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य मोहिमे अंतर्गत किती रुग्णांवरती उपचार झालेत, यातील किती उपचार कितपत यशस्वी ठरले, गरोदर मातांची प्रसूती(childbirth), प्रसूतीनंतर बाळाला दिले जाणारे उपचार, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मिळणारी सेवा आदी विषयांची माहिती आयुक्तालयामार्फत घेतली जाते. घेतलेल्या माहितीचे प्रमाणिकरण झाल्यानंतर प्रत्येक शल्य चिकित्सकाला (Surgeon) गुण दिले जातात. या गुणानुक्रमात हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयाला मराठवाड्यात पहिले स्थान मिळाले आहे. ४३.३३ गुण मिळाल्याने हिंगोली राज्यात पाचव्या क्रमांकावर असून प्रथम स्थानावर ४५.५९ गुण घेऊन कोल्हापूरचे जिल्हा रुग्णालय आहे. मराठवाड्यात दुसर्या क्रमांकावर लातुर ४२.२९ व तिसर्या स्थानावर नांदेड ३५.१२ गुण मिळाले आहेत. याच गुणांकनात जिल्हा आरोग्य यंत्रणा (Health system) मराठवाड्यात दुसर्या क्रमांकावर तर राज्यात १४ व्या क्रमांकावर आहे.
हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी जिल्हा रुग्णालयाच्या या यशाचे श्रेय आपल्या सर्व सहकार्यांना दिले आहे. जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांसोबत पॅरामेडिकल स्टाफ पासून ते अगदी स्वच्छता कर्मचार्यांपर्यंत सर्व सहकार्यांच्या सामुहिक परिश्रमामुळे जिल्हा रुग्णालय चांगले काम करू शकल्याचे डॉ. नितीन तडस यांनी देशोन्नतीशी(Deshonnati) बोलतांना सांगितले.