कुरुंदा (Hingoli) :- वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील सह्याद्री देवराई टोकाईगड फाऊंडेशन गडाच्या आणि पर्यायाने संपूर्ण पर्यावरणाच्या विकास आणि संवर्धनाच्या भुमिकेतुन नेहमीच वेगवेगळे आणि नवनविन उपक्रम गडावर राबवत असतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री गणेश उत्सवानिमित्त आम्ही वडाच्या झाडाच्या खोडावर कच्चे नारळ, नारळाची पाने, नारळाच्या खोडाची साल, नारळाच्या जटा, फेटा इ. वस्तुंचा वापर करून पर्यावरणाला पुरक असणारी गणेश मुर्ती साकारली आहे. श्री गणेश उत्सव पर्यावरणपुरक साजरा करण्यासाठी दरवर्षी आम्ही वेगवेगळं झाड निवडत असतो या अगोदर कंदब, कडुलिंब आणि यावर्षी वडाच्या खोडावर नारळाच्या झाडाच्या संपुर्ण घटकांचा वापर करून मुर्ती साकारली आहे. वसुधंरेचे रक्षण करण्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून वृक्ष गणेशाची मुर्ती कु. पुजा केशवराव इंगोले यांच्या संकल्पनेतून आणि प्राध्यापक नामदेव दळवी यांच्या सहकार्याने निर्माण केली आहे. दोघांचेही सर्वप्रथम मनापासून आभार.
आपला देव प्रत्येकच झाडात पाहावा हा त्या मागचा मुळ उद्देश
मुळात या उत्सवातून प्रत्येकाने आपला देव प्रत्येकच झाडात पाहावा हा त्या मागचा मुळ उद्देश आहे. वास्तविकतः देव आणि दैव ही संकल्पना आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाच्या ज्याच्या-त्याच्या श्रध्देचा विषय आहे. त्या संकल्पनेचं मुळ किंवा सत्यता पडताळून पाहण्याच्या वादात आम्हाला पडायचे नाही, तो आमचा विषयही नाही. पण तरीही सह्याद्री देवराई फाऊंडेशन (foundation) ने मात्र देव पाहिलाय… हो नक्कीच… आम्ही पाहिलाय देव..! मात्र आमचा देव दगडात नाही, आमचा देव देवळात नाही तर आमचा देव झाडात आहे. वर्षांनुवर्षे अन् पिढ्यानपिढ्या तुम्हाला-आम्हाला आपणा सर्वांना प्राणवायू(oxygen) देणारं केवळ झाडंच आहे. (oxygen)महत्त्व आपण कोरोना काळात जाणलयं!) ज्याच्या वाचून कुणीही जगू शकत नाही ते पाणी आपलं जिवन आहे, तेही झाडाच्याच माध्यमातूनच आपल्याला मिळतं. एकंदरीत सांगायचा मुद्दा हा आहे की, oxygen, पाणी आणि भर उन्हात संरक्षण करणारं झाडं आम्हाला आमचा देवच वाटतो आणि त्याचमुळंच आम्ही झाड ह्या एकमात्र देवाला मानतो.
पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न
आजपर्यंत आपण बाप्पाचं आणि निसर्गाचं नातं विसरलो होतो. पर्यावरण पुरक असणारा गणपती सोडून प्लास्टर ऑफ पॅरीसचे (Plaster of Paris) गणपती बनवत होतो, सजावटी साठी प्लास्टीकचा अतोनात वापर करत होतो. त्यातून पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता, होत होता. या सर्व प्रकाराला कुठेतरी बाजूला सारण्याचीही गरज निर्माण झाली होती. त्यामुळे आपण आता पर्यावरणाच्या (environment) व पर्यायाने मानव जातीच्या हिताच्या बाजूने मार्गक्रमण करत आणि गणेश विसर्जनामुळे होणारा जलप्रदूषणचा (Water pollution) धोका कमी करत वृक्षरुपी एक गणेश देवराईत वाढवत आहोत आणि त्याचमाध्यमातून झाडं, फळं आणि फुलांचा ऊत्सव म्हणून निसर्गाची पुजा करणारा पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत. म्हणूनच आपण केवळ वृक्ष गणेशा ची मुर्ती साकारून थांबलो नाही तर त्यापुढे जाऊन या उत्सवांर्तगत गणरायाला झाडचं वाहण्याची आम्ही विनंती आणि आवाहन करत आहोत. सोबतच दर्शनाला येतांना परिसरातील वृक्षप्रेमी बांधव, भाविक भक्त आणि संपूर्ण जनतेला प्रसादाऐवजी प्रसाद म्हणून झाडचं आणावीत, असंही आवाहन केलं आहे.