हिंगोली प्रगतीनगरात पोलीस कर्मचार्याने केलेले गोळीबार प्रकरण
हिंगोली (Hingoli firing case) : शहरातील प्रगती नगर भागात पोलीस कर्मचार्याने सासुरवाडीला येऊन पत्नीसह सासू, मेव्हुणा व स्वत:च्या मुलावर पिस्टलने गोळीबार केला होता. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. उर्वरित तिघांवर उपचार सुरू असताना २९ डिसेंबर रोजी मेव्हुण्याचा नांदेड रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, वसमत शहर पोलीस ठाण्यातील (Hingoli firing case) पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याने आपली पत्नी मयुरी मुकाडे हिच्या सोबत घरगुती वाद झाल्याने २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वसमत शहर पोलीस ठाण्याच्या शस्त्रागारातून पिस्तूल व १४ जीवंत काडतूस चोरून आणल्यानंतर थेट हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये सासुरवाडीला रात्री ८.३० च्या सुमारास आला होता. दरवाजा उघडल्यावर त्याने पत्नी मयुरी मुकाडे हिच्यावर गोळीबार केल्यानंतर घरामधील सासू वंदना धनवे, मेव्हुणा योगेश धनवे यांच्यावरही गोळीबार केला होता.
यामध्ये मयुरी मुकाडे हिचा जागीच मृत्यू झाला होता तर वंदना व योगेश धनवे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रारंभी हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. (Hingoli firing case) प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना नांदेड येथील रूग्णालयात हलविण्यात आले होते. यामध्ये योगेशची शस्त्रक्रिया करण्यात आली होती; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी प्रकृती चिंताजनक होऊन त्याचा सकाळी ११ च्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात मृत्यूची संख्या दोनवर पोहचली आहे. या (Hingoli firing case) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे हे करीत आहेत.