हिंगोली (Hingoli Food Supply Department) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन धान्य वितरण मशीन देत असताना जिल्हा (Food Supply Department) पुरवठा विभागाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना देऊन पुरवठा यंत्रणा कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आणि सर्व सामान्य व पात्र गोर गरीब लाभार्थीना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांनी आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हा पुरवठा विभाग अॅक्शन मोडवर
जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी मागील तीन किंवा अनेक महिने धान्य उचल न करणार्या लाभार्थींची शिधापत्रिका धान्य लाभापासून निरस्त करून त्याऐवजी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबांची धान्य योजनेत निवड करण्याची सूचना दिली आहे. तसेच सधन कुटुंबांनी, आर्थिक दृष्ट्या उन्नत व्यक्ती, सरकारी-खासगी नौकरीधारक, निवृत्ती पेन्शनधारक व्यक्ती, स्वतः च्या दोनचाकी – चार चाकी वाहन असलेले व्यक्ती, सधन व मालमत्ताधारक व्यक्ती आणि अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देश प्रमाणे अपात्र असलेल्या कुटुंब, व्यक्ती किंवा लाभार्थी यांनी स्वतः हून आपले धान्य योजनेचे कार्ड आत्म समर्पित करावे आणि त्याऐवजी भूमिहीन, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर, कुंभार काम करणारी व्यक्ती, चर्म काम किंवा मोची काम करणारी व्यक्ती, विणकर, सुतार, लोहार, तसेच झोपडपट्टीतील रहिवासी, विशिष्ठ क्षेत्रमध्ये रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल रिक्षा चालविणारे, हातगाडीवर मालाची ने – आण करणारे, फळे आणि फूल विक्रेते, गारुडी, कचर्यातील वस्तू गोळा करणारे तसेच बेघर, निराधार व अशाप्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबांची धान्य योजनेतील लाभार्थी म्हणून निवड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
स्वस्त धान्य दुकानदारांनी या कामात (Food Supply Department) पुरवठा विभागास सहकार्य करण्याची सूचनाही देण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी पात्र लाभार्थीना चांगली व दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपली स्वस्त धान्य दुकान आयएसओ मानांकन करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. स्वस्त धान्य दुकान नीटनेटके आणि स्वच्छ ठेवणे, चांगल्या पद्धतीने व स्वच्छता ठेवून योग्यरित्या धान्याचे साठवणूक आणि वितरण करणे, लाभार्थीना बसण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, सर्व अभिलेख अद्यावत ठेवणे, स्वस्त धान्य दुकान वेळेवर उघडणे व बंद करने, दर्शनी भागावर आवश्यक फलक लावणे, धान्य वितरणाचे योग्य नियोजन करणे, धान्य उचल न करणार्या लाभार्थींची यादी तयार करने, सधन व अपात्र लाभार्थींची आवश्यक माहितीचे संकलन करणे, लाभार्थीना वेळेवर धान्य वितरण करणे, स्वस्त धान्य दुकानातील १००टक्के धान्य वितरण करणे, अन्न दिन साजरा करणे, आदी कामे करण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांनी दिलेल्या असल्याने (Food Supply Department) पुरवठा विभाग अॅक्शन मोडमध्ये काम करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.