हिंगोली(Hingoli) :- हिंगोली शहरातील फ्रीडम सेवाभावी संस्था, अंतर्नाद ग्रुप, जायन्ट्स ग्रुप हिंगोलीच्या वतीने शासकीय रुग्णालय परिसर व दुसऱ्या दिवशी गांधी चौकात मतदार जनजागृतीसाठी ‘जागरूक मतदार… हाच खरा लोकशाहीचा आधार हे पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी सदरील कार्यक्रमाचे उदघाटन करुन कौतुक केले.
फ्रीडम सेवाभावी संस्था, अंतर्नाद ग्रुप, जायँन्टस ग्रुप हिंगोलीचा पुढाकार
सद्या हिंगोली जिल्हा व महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक(elections) लागलेली आहे. दरवेळी प्रशासन आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न करूनही समाजातील विविध घटकातील लोकांमध्ये मतदानाबाबत उदासीनता दिसून येते. मतदानाची टक्केवारी 60%ते 65% च्या वर जाताना दिसत नाही. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव व भवितव्य ठरविनारी निवडणूक कधी कधी एकांगी ठरण्याची शक्यता असते. यात राष्ट्राच्या जडणघडणीसाठी अडसर येण्याची शक्यता असते. हिच बाब ओळखून मतदानाचा टक्का वाढावा व योग्य असा उमेदवार लोकांनी निवडून द्यावा यासाठी येथील हौशी कलावंतांनी हे पथनाट्य रचले आहे.या ग्रुपमधील सर्व कलावंत विविध क्षेत्रात कार्यरत असून सांस्कृतिक चळवळ जिवंत राहावी आणि त्या माध्यमातून सामाजिक ऋण हि फेडल्या जावं म्हणून विविध विषयांवार सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात.
मोठ्या प्रमाणात जनसमुदायांकडून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला
हे पथनाट्य विजय ठाकरे यांनी लिहिलेले असून यात डॉ. संजय नाकाडे, रत्नाकर महाजन, डॉ. अभयकुमार भरतीया, विजय ठाकरे, हर्षवर्धन परसवाळे, विकास सावळे, सोनाली धवसे,मोनिका पाईकराव, प्रतीक्षा सुतारे, मनीषा पोटे, दुर्गा रिठे, प्रतीक्षा जोगदंड आणि व्ही. बी. एन. नर्सिंग स्कुलच्या विध्यार्थिनी यांनी विविध भूमिका निभावल्या.या पथनाट्यात व्यंगात्मक आणि विनोदी शैलीने निवडणुकीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करून लोकांना हसवलेही अन निरोगी लोकशाही आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी मतदाराच्या मनाचा ठाव घेऊन मतदानाबाबत त्यांचे उदबोधन करून मतदानासाठी त्यांना प्रवृत्त केले.यावेळी डॉ. नाकाडे आणि विजय ठाकरे यांनी मतदार जागृतीवर पोवाड्यांचे गायन केले. यावेळी डॉ. दीपक मोरे, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. कुलदीप कांबळे, गटशिक्षणाधिकारी नेटके,डॉ. विजय निलावार, डॉ. रामकिशन काबरा,प्रदीप दोडल,शिक्षक श्याम स्वामी, किरण लाहोटी,नीलकंठ गायकवाड, बाळासाहेब पवार,सुदर्शन महाजन,श्यामराव बांगर, रामराव बांगर, शिंदे यासोबत नगरपरिषदचे आशिष रणशिंगे, चेतन, अथर्व,यांच्यासहित मोठया प्रमाणात महसूल, पोलीस आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदायांकडून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.