हिंगोली(Hingoli):- महाराष्ट्र राज्य नगर परिषद (Maharashtra State Municipal Council) संवर्ग अधिकारी संघटनेची सर्वसाधारण सभा १७ ऑगस्टला श्रीक्षेत्र शेगाव (Shegaon)येथे घेण्यात आली. त्यात विविध संवर्ग अधिकार्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने २९ ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
संघटनेच्या द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला निर्णय
१७ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे संघटनेची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र विविध नगर परिषदांचे संवर्ग अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जामोद विधानसभा आमदार संजय कुटे, खामगाव विधानसभा आमदार आकाश फुंडकर हे उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेच्या माध्यमातून मागील काळात विविध संवर्ग अधिकार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, पुढील काळात ज्या मागण्या शासन स्तरावरून सोडवायचे आहेत त्याबाबत सविस्तर व विस्तृत चर्चा करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी संवर्ग अधिकार्यांचे विविध प्रश्न मांडले त्यावर आमदारांनी सदरील प्रश्न जिव्हाळ्याचे असल्याने ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शासनाकडून सोडविण्यात येतील असे सर्वांना आश्वस्त केले. सभेस मुख्याधिकारी जयश्री काटकर, आशिष बोबडे, सतीश पुदाके, विजयकुमार आश्रमा, तसेच, संघटना कार्याध्यक्षा तृप्ती भामरे, सचिव जयवंत काटकर, घटना समिती अध्यक्ष राहुल पिसाळ, नाशिक विभागाध्यक्ष महेंद्र कातोरे, पुणे विभागाध्यक्ष सुनील गोर्डे, अमरावती विभागाध्यक्ष अमोल इंगळे आदी सदस्य व पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचा वार्षिक लेखाजोखा अर्जुन गुट्टे यांनी मांडला. यावेळी विविध पातळीवर उत्कृष्ट कार्य करणार्या सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जुनी पेन्शन योजना व संवर्गाचे मूलभूत समस्या, मागण्यावर शासन स्तरावर दुर्लक्ष होत असल्याने २९ ऑगस्ट पासून सर्व संघटना सह संपात सहभागी होण्याचा निर्णय एकमताने यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्धीप्रमुख राहुल कुटे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यास अमरावती विभागाध्यक्ष अमोल इंगळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश घुगे, जगन्नाथ थोरात, रवींद्र सूर्यवंशी आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.