हिंगोली (Hingoli Garden) : शहरातील देवडानगर भागामध्ये नगर परिषदेच्यावतीने उद्यान उभारण्यात आलेले आहे. या उद्यानात अनेक खेळण्यांसह स्वच्छतागृह आदींचा अभाव असल्याने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या कोट्यावधी रूपयाच्या रकमेतून तब्बल २४ वर्षानंतर कायापालट होणार आहे. स्वातंत्र्य सैनिक स्व.अण्णाराव टाकळगव्हाणकर बालोद्यान हे नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहे.
मागील गेली काही वर्षापूर्वी हे (Hingoli Garden) उद्यान सुरू करण्यात आले. उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे, शोभीवंत वृक्ष, कारंजा आदी उभारण्यात आले. याच उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा स्मृती स्तंभही उभारण्यात आलेला आहे. हिंगोली शहरामध्ये हे उद्यान आकर्षक असून कालांतराने उद्यानातील अनेक खेळण्यांची तुटफुट झाली. तसेच कारंजेही बंद पडले होते. विशेष म्हणजे उद्यानामध्ये प्रत्येक दिवशी अनेक महिला, पुरूष, युवक, युवती येतात. अशावेळी त्यांना स्वच्छतागृह नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
उद्यानाची संरक्षण भिंत काही ठिकाणी कोसळल्याने उद्यानातील साहित्य चोरीच्याही घटना घडल्या. त्यामुळे या (Hingoli Garden) उद्यानाचा कायापालट करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करावा अशी मागणी नगर पालिके तर्फे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून ६ ते ७ कोटी रूपये उपलब्ध झाल्याने उद्यानाचा कायापालट करण्यास सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता संपुष्टात आल्यानंतर उद्यानातील कामे सुरूवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये वॉकींग ट्रॅक, सिटींग ग्राऊंड, १७ सप्टेंबर निमित्त स्वातंत्र्य मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमा करीता येणार्या मान्यवरांसह नागरिकांकरीता दोन कायमस्वरूपी शेड, महिला व पुरूषांसाठी चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह, रखलवादारासाठी स्वतंत्र निवास, कारंजे आदी कामे या निधीतून केली जाणार आहेत. तब्बल २४वर्षानंतर या उद्यानाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना मनसोक्त आनंद लुटण्याकरीता एक पर्वणी उपलब्ध होणार आहे.
सन २००० मध्ये उद्यानाचे झाले होते उद्घाटन
हिंगोली नगर परिषदेच्यावतीने देवडानगर भागात सुरू करण्यात आलेल्या (Hingoli Garden) उद्यानाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २००० रोजी झाले होते. तब्बल २४ वर्षानंतर उद्यानासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी प्राप्त झाल्याने कायापालट होणार आहे.
मुख्याधिकार्यांनी सुरू झालेल्या कामाची केली पाहणी
हिंगोली शहरातील देवडानगर भागामधील नगर परिषदेच्या उद्यानाचा कायापालट केला जात आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेल्या ६ ते ७ कोटी रूपयाच्या निधीतून उद्यानातील अनेक अंतर्गत कामे करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळल्याने ती सुद्धा याच कामामध्ये दुरूस्त केली जाणार आहे. ही कामे सुरू झाली असल्याने नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह नगर अभियंता प्रतिक नाईक यांनी पाहणी केली. यावेळी आर्किटेक सुनील चौधरी यांनी (Hingoli Garden) उद्यानातील नकाशासह होणार्या कामाची माहिती मुख्याधिकारी मुंढे यांना दिली.




