हिंगोली (Hingoli Heavy Rain) : वसमत तालुक्यात सर्वत्र सततधार पाऊस झाला. आरळ जवळील थुना नदीला पूर आला असता गुराखी बाबूराव पुरभाजी वाघ (५५) रा.आरळ हे २८ जुलै रोजी जनावरे घेऊन जात असताना पुरातून वाहून गेले होते. शोधमोहीम सुरू असताना २९ जुलैला त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली जिल्हाभरात सर्वत्र सततधार पाऊस सुरू आहे. रात्रीच्या वेळेस (Heavy Rain) जोरदार पाऊस कोसळत आहे. वसमत तालुक्यातील आरळ नजीक असलेल्या थुना नदीला पूर आला होता. याचवेळी गुराखी बाबूराव पुरभाजी वाघ हे २८ जुलैला आपली जनावरे घेऊन नदीतून जात असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गुराखी पाण्यातून वाहून गेला होता.
पुराच्या पाण्यातून जनावरांनी नदीचा काठ गाठला; परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे वाहत्या पाण्यातून गुराखी वाघ हे वाहून गेले होते. घटनेची माहिती हट्टा पोलिसांना मिळाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, गोविंद जाधव, महेश अवचार, सूर्यवंशी, टी.पी.कासले, एकबाल शेख यांच्यासह तलाठी ए.बी.आहेर व जिवरक्षकांनी बाबूराव वाघ यांची शोध मोहीम सुरू ठेवली होती. (Heavy Rain) बर्याच ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर २९ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास आरळ शिवारात गुराख्याचा मृतदेह आढळून आला. हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शमशोद्दीन सिद्दीकी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. याप्रकरणी हट्टा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती.