हिंगोली (Hingoli Hospital) : येथील नव्याने होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (Medical College) मान्यता आचार संहितेमुळे रखडली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी ही मान्यता न मिळाल्यास यंदाचे वर्षही वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. १ नोव्हेंबर २०२३ रोजी हिंगोलीसहीत राज्यात एकूण ९ महाविद्यालयांना (Hingoli Hospital) मंजुरी मिळाली होती. वास्तविक त्यापूर्वीच ही मंजुरी मिळू शकली असती; परंतु राजकीय व प्रशासकीय प्रयत्नांच्या अभावी जमीन हस्तांतरीत न झाल्यामुळे मंजुरीला विलंब झाला.
राज्यशासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष (Medical College) वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अनेक सोपस्कार पार पाडावयाचे असतात. त्यापैकी नॅशनल मेडिकल कॉन्सिल अर्थात राष्ट्रीय चिकित्सा आयोगाची मान्यता ही महत्वाची व शेवटची प्रक्रिया असते. लोकसभेची आचार संहिता लागल्यामुळे देशभरातील नवीन (Medical College) वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेला काहीसा विलंब झाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परिक्षेचे निकाल लागले असून, लवकरच प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. दरम्यान महाविद्यालयाचे डीन १ डिसेंबरपासून नियुक्त झाले आहेत. त्यांच्या नियुक्ती पासून जागेचे हस्तांतरण, लेखाशिर्षाला मंजुरी, पदनिर्मिती, पदभरती अशा अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. प्रवेश सुरू होण्यापूर्वी एन.एम.सी.ची मान्यता न मिळाल्यास यंदाचे वर्ष वाया जाते की काय, अशी भिती व्यक्त होत आहे.
४०३ कोटींचा आराखडा मंजूर
हिंगोली शासकीय (Hingoli Hospital) महाविद्यालयाकरीता पशूपैदास विभागाची जागा हस्तांतरीत झाल्याची माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ.चक्रधर यांनी देशोन्नतीशी बोलतांना दिली आहे. या सोबतच शासनाने इमारत बांधणी व इतर कामांसाठी ४०३ कोटींच्या आराखड्याला मान्यताही दिल्याचे त्यांनी सांगितले.