हिंगोली(Hingoli):- देशात रस्ते अपघाताची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. शासन रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध उपक्रमातून जनजागृती करत आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक निरपराध लोकांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी केले.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा सुरक्षित करण्याचा प्रयत्न-जिल्हाधिकारी अभिनव गोयल
परिवहन विभाग (Transport Department)व पोलीस विभागाच्या (Police Department)संयुक्त विद्यमाने सध्या राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 हे 31जानेवारी पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याकरिता ‘परवाह’ अर्थात इंग्रजी मधील केअर ही थीम घोषित करण्यात आली आहे. या अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम आज येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती नलिनी काळपांडे, गट शिक्षणाधिकारी नितीन नेटके आदी उपस्थित होते.
दुचाकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले
यावेळी बोलताना श्री. उमाप म्हणाले, सध्या दुचाकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे अल्पवयीनांनी तसेच विनपरवाना वाहन चालवू नये. वाहतूक नियमांचे (Traffic regulations)पालन करत हेल्मेट वापरावे. हेल्मेटमुळे सुरक्षा मिळते. विविध अपघातातून वाचविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच भाग म्हणून हे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. तरुण पिढीने वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करुन व स्वत: अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. जिल्ह्यात रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना, कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येत आहेत. आपला जीव सुरक्षित राहावा, यासाठी सदैव जनजागृतीतून प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे अपघात टाळण्यासाठी व निरपराध लोकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अध्यक्षीय समारोपात रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत सर्वांची कार्यशाळा, बाईक रॅली, नेत्र तपासणी शिबिर तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. या माध्यमातून हिंगोली जिल्हा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाचा सहभाग महत्वाचा
जबाबदार नागरिकांमध्ये बदल घडविण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाचा सहभाग महत्वाचा आहे. यामध्ये महिन्यातून एखादा तास रस्ता सुरक्षा मार्गदर्शनासाठी दिल्यास याचा रस्ते अपघात टाळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले, वाहनाचे वाढते अपघात लक्षात घेता आपण व आपल्या नातेवाईकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन आपणाला व आपल्या नातेवाईकाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी रस्ता सुरक्षा अभियानात शिक्षण विभागाचा महत्वाचा सहभाग असून सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. तसेच कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. या बाईक रॅलीमध्ये पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, शिक्षक, नागरिकांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर इंगोले यांनी केले तर पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी, वाहनचालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.