हिंगोली (Hingoli Janata Samvad) : नागरिकांच्या अडी-अडचणी समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात प्रत्येक शनिवारी नागरिकांशी ‘जनता संवाद’ व ‘तक्रार निवारण दिन’ (Hingoli Janata Samvad) आयोजित करण्यात येत आहे. त्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यात घेण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती झाली.
11 ऑक्टोबर रोजी नांदेड परिक्षेत्रात पहिल्यांदा जनता संवाद व तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गंगाखेड पोलीस ठाणे येथून सदर कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता. या दिवशी नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली अशा चार जिल्ह्यातील एकूण (508) तक्रारीचे निराकरण करण्यात आले होते.
18 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यात पुन्हा जनता संवाद (Hingoli Janata Samvad) व तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात तक्रार निवारण दिनामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पाच, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी एक पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी 14 अशा एकूण 24 तक्रारींची निर्गती करण्यात आली.
दर शनिवारी प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर, आयोजित करण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनानिमित्त, नागरिकांना पोलीस ठाणे प्रमुखांसोबतच, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपलब्ध होत असून, आपल्या तक्रारी सोडवून घेण्यासाठी आता आठवड्यातील एक दिवस निश्चित झाला आहे.
गत सप्ताहाचे तुलनेत, या आठवड्यात नागरिकांच्या तक्रारींची अधिक प्रमाणात सोडवणूक झाली असून, तक्रार सोडवणुकीच्या कामकाजात वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी सोडवून घेण्यासाठी सदर व्यवस्थेचा सुयोग्य उपयोग करून घ्यावा व दर शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यास सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहून आपल्या तक्रारींची सोडवणूक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले.