हिंगोली (Hingoli Maratha) : जातीय तेढ निर्माण करून जिल्ह्यातील सामाजिक एकोपा बिघडविणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
२७ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले की, औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथे वैयक्तीक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेला जातीय रंग देऊन काहीजण जिल्ह्यातील सामाजिक एकोपा बिघडवून राजकीय पोळी भाजण्याकरीता ज्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही त्यांच्यावर खोटारडे आरोप करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. वैयक्तीक वादाला जातीय रंग देऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर ओबीसी विरोधी मराठा असा वाद पेटवून जिल्ह्यात जातीय दंगली पेटविण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याने त्यांच्यावर कायदेशी कारवाई करावी व जिल्ह्यातील सामाजिक एकोपा अबाधीत ठेवण्याकरीता प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर संजय पाटील बोंढारे, विजय पाटील बोंढारे, राम कदम, राजू चापके, अभय पाटील सावंत, मयूर शिंदे, शेषराव बोंढारे, भागवत पाटील हातमाली, शुभम भोयर, शंतनू सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षर्या आहेत. याबाबतचे निवेदन अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांना देण्यात आले असता सदर प्रकरणात चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील,पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांचीही उपस्थिती होती.