वस्तूनिष्ठ अहवाल आठ दिवसात सादर करावा लागणार
राज्याच्या सहसचिवांनी जिल्हाधिकार्यांना पाठविले पत्र
हिंगोली (Hingoli Municipal Council) : शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करवाढी संदर्भात नोटीस बजावल्या होत्या. त्यावरून निवेदन बाजी झाल्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हा प्रश्न शासनदरबारी मांडताच सदर प्रश्नात मालमत्ता कर वाढ प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती दिल्याबाबतचे आदेश राज्याचे सहसचिव विद्या हम्पय्या यांनी गुरूवारी काढले आहेत.
हिंगोली शहरामधील नागरिकांना नगर परिषदेने जाचक कर वाढी संदर्भात चांगलीच ओरड झाली. या करवाढीकरीता आक्षेप घेण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. कर वाढ रद्द करावी यासाठी व्यापारी महासंघ व पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नगर पालिकेकडे निवेदन दिले होते. सदर प्रश्नी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ही करवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती.
त्याचवेळी करवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. १९ डिसेंबरला राज्याच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून मालमत्ता कर वाढीस तात्पुरती स्थगिती देऊन याप्रकरणी वस्तूनिष्ठ अहवाल हा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आठ दिवसात नगर विकास विभागाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.