सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील घटना
सख्ख्या भावाच्या खुनानंतर आरोपी मोठ्या भावाने लहान भाऊ बेपत्ता असल्याची गोरेगाव पोलिसात केली नोंद
गोरेगाव पोलिसात मोठ्या भावासह दोघांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Murder Case) : सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील मोठ्या भावाने संपूर्ण शेत जमीन आपणास मिळावी या उद्देशाने मित्राच्या मदतीने लहान भावाचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह खड्ड्यामध्ये पुरून टाकला. या खुनाला वाचा फुटल्यानंतर पोलिसांनी 15 डिसेंबरला सख्ख्या भावासह त्याच्या मित्राला जेरबंद करून गुन्हा दाखल केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेगाव खोडके येथील हरीभाऊ किसन खोडके व शिवाजी किसन खोडके हे सख्खे भाऊ आहेत. त्यांना 16 एकर शेत जमीनही आहे. यामध्ये हरिभाऊ खोडके हे विवाहित असून त्यांचा लहान शिवाजी खोडके हा अविवाहित आहे. भाऊसंपूर्ण जमीन मला मिळावी व सततच अपमान करीत असल्याच्या कारणावरून हरीभाऊने आपला लहान भाऊ शिवाजी खोडके (२२) याला १२ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास बोलावून घेतले होते.
यावेळी शिवाजी खोडके हा पवन आखाडे यांच्या शेतातील विहिरीजवळ आला असता (Hingoli Murder Case) त्याच्यासोबत हरीभाऊने शाब्दीक बाचाबाची करून त्याचा गळा दाबून व गळ्यावर दगडाने मारून खून केला. हा गळा दाबत असताना त्याने आपल्या सोबत आणलेला मित्र पवन धोंडू आखाडे याने शिवाजीचे पाय धरले. त्यानंतर शिवाजीचा मृतदेह कोठेतरी जमिनीत पुरून टाकावा याचा बेत दोघांनी आखल्यानंतर शेताजवळील ओढा असलेल्या बांबुच्या झाडाजवळ त्यांनी मोठा खड्डा करून शिवाजी खोडकेचा मृतदेह पुरून टाकला. यानंतर शिवाजी खोडके हा नेहमी सारखा घरी आला नसल्याने त्याच्या आईवडीलानी मोठा मुलगा हरीभाऊकडे विचारपूस केली असता त्याने शिवाजी कोठेतरी गेला असावा, असे सांगून वेळ मारून नेली.
दुसर्या दिवशी शिवाजीच्या काही मित्रांनी शिवाजीची विचारपूस हरीभाऊकडे केली असता त्यांनाही तसेच कारण सांगितले; परंतु मित्रांनी ही बाब आपण पोलिसांना सांगावी असे हरीभाऊला म्हटले असता त्याच्या पायाखालची वाळू घसरली आणि आपले कृत्य उघड होणार अशी भिती मनामध्ये वाटत होती. त्यामुळे हरीभाऊने १३ डिसेंबरला थेट गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याचा लहान भाऊ शिवाजी खोडके हा घरातून न सांगता निघून गेला असल्याची नोंद केली. त्या अनुषंगाने गोरेगाव पोलिसांनी तपास सुरू केला असता (Hingoli Murder Case) दोन भावांमध्ये शेत जमिनीचा वाद मागील काही कालावधीपासून सुरू असल्याबाबत खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हरीभाऊ खोडके याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला भाऊ शिवाजी खोडके याचा खून करून मृतदेह ओढ्यातील खड्ड्यात पुरला असल्याचे सांगितले.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, पोलीस उपनिरीक्षक निलेश लेनगुळे, अनिल भारती, सपोउपनि शेषराव राठोड, प्रसन्नजीत नरवाडे, विठ्ठल नवले, अशोक काकडे, इम्रान पठाण, विठ्ठल खोकले यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पुरलेला मृतदेह पंचासमक्ष बाहेर काढला. या (Hingoli Murder Case) प्रकरणात गोरेगाव पोलिसात १५ डिसेंबरला नारायण नामदेव खोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा भाऊ हरीभाऊ किसन खोडके याच्यासह त्याचा मित्र पवन धोंडू आखाडे रा.शेगाव खोडके या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी भेट दिली. मयत शिवाजी खोडके याचे शवविच्छेदन रविवारी डिसेंबरला सेनगाव ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना जेरबंद केले.




