प्रगतीनगरात सासुरवाडीला झालेला गोळीबार
मृत्यूची संख्या झाली तीन
हिंगोली (Hingoli Murder Case) : शहरातील प्रगतीनगर भागात सासुरवाडीला आलेल्या जावयाने पत्नी, मेव्हुणा व सासुवर गोळीबार केला होता. यामध्ये पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर नांदेड रूग्णालयात मेव्हुण्याचा मृत्यू २९ डिसेंबरला झाला असताना आता सासुचाही ३० डिसेंबरला उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची संख्या तीन झाली आहे.
वसमत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विकास मुकाडे याने २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागामध्ये सासुरवाडीला जाऊन गोळीबार केला होता. तसेच या घटनेत आरोपी विलासचा मुलगा हा सुद्धा जखमी झाला होता. गोळीबारात पत्नी मयुरी मुकाडे हिचा जागेवरच मृत्यू (Hingoli Murder Case) झाला होता. सासू वंदना धनवे व मेव्हुणा योगेश धनवे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना तात्काळ नांदेड येथील रूग्णालयात उपचार केला जात होता.
योगेश धनवे याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २९ डिसेंबरला उपचारा दरम्यान योगेशचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी सासू वंदना धनवे हिचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी विलास च्या मुलाची प्रकृती चांगली असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात विलास मुकाडे व सासरच्या कडून मयुरीचा छळ केला जात असल्याने या प्रकरणात सासरच्यांवरही गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी त्यांचे नातेवाईक हिंगोली ग्रामीण पोलिसात आले होते. यामध्ये पोलिसांनी योग्य ती चौकशी केली जाईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले.




