हिंगोली (Hingoli Murder case) : परभणी जिल्ह्यातील मानवत येथील खुनाच्या घटनेत फरार असलेला आरोपी लिंबाळा मक्ता भागात नाव बदलून वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून त्याचा शोध घेतला असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले. परभणी जिल्ह्यातील (Manvat Police) मानवत पोलिस ठाण्यात (Murder case) खुनाच्या गुन्ह्यातील फरारी असलेला आरोपी मंजीतसिंग मायासिंग टाक रा.मानवत हा मागील एक वर्षापासून आपली ओळख लपवून लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडबा मगरे, प्रेम चव्हाण, राजू ठाकुर, दिलीप बांगर यांच्या पथकाने लिंबाळा मक्ता भागात १ ऑगस्ट रोजी जाऊन पाहणी केली असता पोलिस आल्याची कुणकुण मंजीतसिंग टाक याला लागल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पाठलाग करून त्याला पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात टाक यांना आणल्यानंतर मानवत येथील गुन्ह्यामध्ये फरारी असल्याची कबुली त्याने दिली. यानंतर गुन्हे शाखेने (Manvat Police) मानवत पोलिस ठाण्याला याबाबतची माहिती दिल्यावर त्यांचे पथक बोलावून आरोपी मंजीतसिंग टाक याला त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी पथकाचे कौतुक केले.