हिंगोली(Hingoli) :- तालुक्यातील डिग्रस कर्हाळे येथील २४ वर्षीय तरूणाचा मृतदेह (dead body) २३ ऑगस्टला सकाळच्या सुमारास घरासमोर आढळून आला. संशयास्पद अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणात सायंकाळी उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये तरूणाचा गळा आवळून खून केल्याचा उल्लेख केला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डिग्रस कर्हाळे येथील माधव बाबुराव गोरे (२४) हा तरूण गुरूवारी रात्री जेवण करून झोपला होता; परंतु २३ ऑगस्टला सकाळी ६ च्या सुमारास माधवचा मृतदेह घरासमोरच आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने प्रारंभी जाऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी मारोती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, विजय रामोड, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे, असलम गारवे, सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर माधवचा संशयास्पद मृत्यू (dead) झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होताच तात्काळ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; परंतु श्वान पथक घटनास्थळावरच घुटमळले.
मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला
यानंतर पोलिसांनी माधवचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदना(Autopsy) साठी पाठविला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. माधवच्या पश्चात आई, भाऊ, वहिणी असा परीवार आहे. माधव गोरे याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरविले; परंतु कुठेही या बाबीचा तपास लागला नाही. शवविच्छेदनानंतर या खुनाचा उलगडा झाला.
तपासाचे आव्हान:- या युवकाचा नेमका कोणी व कशासाठी खून केला, याचा उलगडा करणे हे पोलिसांसाठी सध्यातरी आव्हानकारक आहे. या घटनेमुळे मात्र ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले.
वरिष्ठांच्या भेटी:- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या.
शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल
माधव गोरे या २६ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ५.४१ वाजता गोकर्णा गोरे यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये माधव गोरे हा राहत्या घरी झोपला असताना अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून त्याचा गळा आवळून मारहाण करून खून करून त्याचा मृतदेह त्यांच्याच ओट्यावर ठेवल्याचे नमूद केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल घुले हे करीत आहेत.