मांजा विक्रीतून आदेशाचे उल्लंघन स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची कामगिरी
हिंगोली (Hingoli Nylon Manja) : जानेवारी महिन्यात मकर संक्रांत आल्यामुळे सध्या हिंगोली शहरात अनेक ठिकाणी पतंग उडविण्याकरीता नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. हा नायलॉन मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.
हिंगोली शहरातील महावीर स्तंभापासून काही अंतरावर असलेल्या मेडिकल लाईनमध्ये आयुष जगदीश साहू हा (Nylon Manja) नायलॉन मांजाची विक्री करीत असताना ९ डिसेंबरला सायंकाळी ४ च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात ५४०० रूपयाचा मोनोफिल गोल्ड व हिरोप्लस कंपनीचे एकूण ९ बंडल जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, राजू ठाकुर, लिंबाजी वाव्हुळे यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे शिवराज नगर भागात हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय क्षीरसागर, अशोक धामणे संभाजी लकुळे, संतोष करे, अजहर पठाण, गणेश लेकुळे यांच्यासह पोलिसांनी मारलेल्या छाप्यात महेश विष्णू चक्रवार रा.गाडीपुरा हिंगोली याच्याकडून १५ हजार रूपयाचे १० मांजाच्या नायलॉनचे बंडल जप्त केले. सदर (Nylon Manja) मांजा विक्री करण्याकरीता नेत असताना मिळून आल्याने हिंगोली शहर पोलिसात धनंजय क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.