हिंगोली(Hingoli) :-जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर उल्लेखनीय कर्तव्य बजावणाऱ्या अनेकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते; परंतु या सोहळ्यात आमदार तानाजीराव मुटकुळे यांना नवख्या प्रशासनाने डावल्याचे कार्यक्रम स्थळी दिसून आले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर मध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला
मध्यंतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्याने जिल्हाधिकारी(Collector), जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदींच्या बदल्या झाल्या आहेत. ज्यामध्ये एकमेव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती झाल्याने ते रुजू झाले आहेत. उर्वरित विभागांमध्ये सध्या प्रभारी राज सुरू आहे. अशा अधिकाऱ्यांवर प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. पालकमंत्री (Guardian Minister)अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपविलेले असल्याने यंदाच्या 15 ऑगस्टला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर मध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यामुळे हिंगोलीत यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार आदींची उपस्थिती ध्वजारोहण सोहळ्यानंतर विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले परंतु ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांना या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलविण्याचे औचित्य प्रशासनाला दाखविता आले नाही. विशेष म्हणजे संपूर्ण पुरस्कार वितरण सोहळा पूर्ण होईपर्यंत आमदार तानाजीराव मुटकुळे हे लोकप्रतिनिधी सह इतर मान्यवर कार्यक्रम स्थळी उभारलेल्या सभा मंडपात बसून होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना आमदार मुटकुळेंची आठवण झाली; परंतु आमदार मुटकुळे हे मात्र सभा मंडपातून आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत निघून गेले. अशा घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली.