हिंगोली (Hingoli Police) : शहरात मोटार वाहन कायद्याचे (Motor Vehicle Act) उल्लंघन करणार्या वाहन चालकाविरूद्ध प्रभावीपणे कारवाई केली जात आहे. मागील आठवड्यात शहर वाहतूक शाखेतर्फे १२८८ वाहन चालकांवर १३ लाख १९ हजार ४५० रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे. हिंगोली शहरामध्ये वाहतुकीला शिस्त लागावी. यासाठी शहर वाहतूक शाखे तर्फे (Traffic police) प्रयत्न केले जात असून, या संदर्भात अनेक वेळा वाहन चालकांत जनजागृतीही केली जाते.
हिंगोली शहर वाहतूक शाखेची आठवड्यातील कारवाई
हिंगोली शहरात १० ते १६ जून या दरम्यानच्या कालावधीत (Hingoli City Police) शहर वाहतूक शाखेतर्फे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उपसण्यात आला. त्यात भरधाव वेगातील वाहने चालविणार्या २५८ वाहन चालकांवर ५ लाख १८ हजाराचा दंड आकारण्यात आला. तसेच ट्रीपल सीट वाहन चालविणार्या वाहन चालकांवर २१७ केसेस करून २ लाख १७ हजाराचा दंड आकारण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्या ४० वाहन चालकांवर ४० हजाराचा दंड व इतर विविध कलमान्वये ७१३ वाहन चालकांवर ५ लाख ४४ हजार ४५० रूपयाचा दंड अशा एकूण १२८८ वाहन चालकांवर १३ लाख १९ हजार ४५० रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर उपसला बडगा
ही कारवाई पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर (Traffic Police) वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, गजानन राठोड, सुभाष घुगे, वसंत चव्हाण, शिवाजी पारसकर, संभाजी मोरे, संजय चव्हाण, संतोष घुगे, राजकुमार सुर्वे, सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, विद्या भुजबळे यांनी केली आहे. प्रत्येक दिवशी शहर वाहतूक शाखे तर्फे ही कारवाई केली जात असून, वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न होत आहे.