पोलिस अधिक्षकांकडून होणार्या कारवाईकडे अनेकांचे लागले लक्ष
हिंगोली (Hingoli Police) : एकीकडे अवैध धंदे बंद असल्याचा कांगावा पोलिसांकडून केला जात असताना हिंगोली शहरात मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांच्याच पथकाने मारलेल्या दोन ठिकाणच्या छाप्यावरून अवैध धंद्याचे पितळ उघडे पडत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी अवैध धंद्याविरूद्ध आक्रमक धोरण स्विकारलेले असताना हिंगोली शहरात मात्र अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे.
विशेष म्हणजे अवैध धंद्यावरून अनेक वेळा लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांसह विशेष पोलिस महानिरीक्षकांकडेही याकडे तक्रारी केलेल्या आहेत. हिंगोली शहर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यावसायिकांनी आपले पाय भक्कमपणे रोवले असल्याचे पोलिसांच्याच छाप्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या अवैध धंद्याला कोणाचे पाठबळ आहे याबाबत चर्चेला उधाण पेटले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना भागातील एका पानटपरीमध्ये मारलेल्या छाप्यात मिलन डे मटका जुगाराच्या चिठ्ठ्या मिळून आल्या.
यामध्ये नगदी २२०० रूपये जप्त केले. गुन्हे शाखेचे विशाल खंडागळे यांनी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश मल्लू शांकट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या पथकाने मटक्यावर छापा मारल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी देखील कामगिरी केल्याची बतावणी केली. ज्यामध्ये शहरातील कमलानगर भागातील मुकबधीर शाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेत लोकांकडून पैसे घेऊन त्यांना मिलन नाईट मटका जुगाराच्या चिठ्ठ्या देताना गणेश लेकुळे यांनी शेषराव सिताराम इंगळे रा.अंधारवाडी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नगदी ४१० रूपये जप्त करून हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. या छाप्यावरूनच हिंगोली शहरात अवैध धंदे जोमाने चालू असल्याचे सिद्ध होते.