२२ ठिकाणी ३४१ देशी दारूच्या बाटल्या जप्त
हिंगोली (Hingoli Police) : पोलिसांनी दर्श अमावस्येला जिल्हाभरात मारलेल्या ३८ ठिकाणच्या छाप्यात ३९ आरोपींकडून हजारो लिटरचा अवैध दारूसाठा जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले. नांदेड परीक्षेत्राचे (Hingoli Police) पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ४ ऑगस्टला हिंगोली जिल्ह्यात अवैध दारू गाळप व विक्री विरोधात विशेष मोहीम जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात देखरेखीखाली राबविण्यात आली. या मोहिमेत (Hingoli Police) अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, मारोती थोरात तसेच तेराही पोलिस ठाण्याचे अधिकारी, १८ दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे ४ अधिकारी व १४४ अंमलदारांनी या संपूर्ण मोहिमेत सहभाग घेतला.
३८ गुन्ह्यात ३९ आरोपींवर गुन्हे दाखल
पोलिसांनी (Hingoli Police) जिल्ह्यातील एकूण १६ अवैध हातभट्टीचे गाळप व विक्री विरूद्ध कारवाई करून त्या ठिकाणी हातभट्टीचे लागणारे रसायन व इतर साहित्य नष्ट केले. या छाप्यात ३३६ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. तसेच हातभट्टी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे १४१८ लिटर सडके रसायन जप्त केले. त्याचप्रमाणे अवैध देशी दारू विक्रीच्या २२ ठिकाणी मारलेल्या छाप्यात ३४१ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जिल्ह्यात एकूण ३८ ठिकाणच्या छाप्यात ३९ दारू विक्रेत्यांविरूद्ध (Hingoli Crime) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.