हिंगोली (Hingoli Police) : जिल्ह्यात १० ऑगस्टला अवैध दारू गाळप व विक्री विरोधात प्रभारी पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली. ज्यामध्ये २९ ठिकाणी छापे मारून १ लाख १८ हजार ९२० रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला.
या छाप्यामध्ये हिंगोलीत एका छाप्यात ३६००रुपयांची दारू जप्त केली. बासंबा ठाणे हद्दीत २ छाप्यात ५९५०, हिंगोली ग्रामीण तिन छाप्यात ३७८०, सेनगाव एका छाप्यात १ हजार, औंढा ना. तिन छाप्यात २८०० रुपये, गोरेगाव दोन छाप्यात १२२०० रुपये, नर्सी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत एका छाप्यात ८८० रुपये, वसमत शहर ठाणे हद्दीत दोन छाप्यात ४८०० रुपये, वसमत ग्रामीण ठाणे हद्दीत दोन छाप्यात ३५०० रुपये, हट्टा ठाणे हद्दीत एका छाप्यात २०७० रुपये, आखाडा बाळापूूर ठाणे हद्दीत दोन छाप्यात ३३५०० रुपये, कुरूंदा ठाणे हद्दीत चार छाप्यात ६७४० रुपये तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच ठिकाणी मारलेल्या छाप्यात ३८१०० रुपयांचा हातभट्टी दारूसाठा व ४८० लिटर सडके रसायन जप्त करण्यात आले.
एकूण २९ ठिकाणी पोलीसांनी छापे मारून ३० आरोपी विरुध्द गुन्हे दाखल केले. ज्यामध्ये १३३ लिटर हातभट्टी दारू, १७७५ लिटर सडके रसायन आणि ३२१ देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण १ लाख १८ हजार ९२० रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. (Hingoli Police) प्रभारी पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे ५ अधिकारी व ११७ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
मोहिम अखंडपणे सुरू राहणार -अर्चना पाटील
जिल्ह्यातील अवैध दारूचा नायनाट करण्याच्या उद्देशाने छापे मारले जात आहेत. त्यामुळे ही मोहिम भविष्यात ही अखंडपणे सुरू राहणार अशी प्रतिक्रिया (Hingoli Police) प्रभारी पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिली.