हिंगोली (Hingoli Police) : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सेनगाव शहरात रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना दोन जनावरे गंभीर अवस्थेत दिसुन आल्याने त्यांनी वाहन थांबवुन पाहणी केल्यानंतर तात्काळ डॉक्टरांना बोलावुन या जनावरांवर उपचार केल्याने दोन्ही जनावरांचे प्राण वाचले. कुठेही अनुचित घटना घडु नये या दृष्टीकोणातुन पोलीसांचे पथक रात्रीच्या सुमारास गस्तीवर असते.
जिल्हा पोलीस (Hingoli Police) अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लु, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, इंगोले हे पथक २७ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सेनगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना एका ठिकाणी दोन जनावरे गंभीर स्थितीमध्ये त्यांच्या निदर्शनास आले.
पोलीसांनी वाहन थांबवून जनावरांची पाहणी केल्यावर या जनावरांनी काही तरी खाल्यामुळे कदाचित विषबाधा झाली असेल असा अंदाज लावुन सेनगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक तांबे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांच्यासह राजु जाधव, गजानन कुंडकर, सुभाष बांगर हे कर्मचारी देखिल घटनास्थळी आले. (Crime Branch Police) पोलीसांनी रात्रीच्या सुमारास पशु वैद्यकिय अधिकारी श्रीकांत देवकर यांना बोलावुन घेतले. त्यांनी देखिल तात्काळ घटनास्थळी येवुन दोन्ही जनावरांवर जवळपास दोन ते तिन तास उपचार केल्यानंतर दोन्ही जनावरे सुस्थितीत आले. विशेष म्हणजे पोलीसांनी तत्परता दाखविल्यामुळे या दोन्ही जनावरांचे प्राण वाचले. त्यामुळे पशु पालकातुन पोलीसांच्या तत्परतेबद्दल कौतुक व्यक्त केले जात आहे.